गुहागर : वरवेली-शिंदेवाडी रस्त्याला नदीचे स्वरूप

Jul 19, 2024 - 10:19
Jul 19, 2024 - 11:33
 0
गुहागर : वरवेली-शिंदेवाडी रस्त्याला नदीचे स्वरूप

गुहागर : तालुक्यातील वरवेली बौद्धवाडी फाटा ते बौद्धवाडी मार्गे शिंदेवाडी फाटा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

पावसाळ्यात या रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त होते. या रस्त्यावरून मोठी रहदारी असते. या मार्गावर बौद्धवाडी, मधली शिंदेवाडी, भुवडवाडी, गावडे अवेरेवाडी, रावंणगवाडी, बाळ शिंदेवाडी आदी वाडीतील ग्रामस्थांची ये-जा सुरू असते. ग्रामस्थांनी अनेकवेळा रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात तसेच नव्याने डांबरीकरण करण्याबाबत अनेकदा पंचायत समिती व जिल्हा परिषद बांधकाम विभागाला निवेदन देऊन मागणी केली आहे. गतवर्षी या रस्त्यासाठी उपोषणाचा इशाराही देण्यात आला. मात्र, केवळ आश्वासनेच पदरी पडली.

उन्हाळ्यात या रस्त्यावर नागरिकांनी माती टाकून थोडेफार खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला; परंतु पावसाच्या पाण्याने खड्ड्यातील सर्व माती वाहून गेली असून संपूर्ण रस्त्याला खड्डेच खड्डे पडलेले दिसून येत आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे कुणी लक्ष देईल का? असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

पावसाळ्यात रस्त्याला नदीचे रूप 
या रस्त्याला दुतर्फा गटारे नसल्याने पावसाळ्यात रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त होते. या रस्त्याकडे येणाऱ्या अन्य रस्त्यांना गटारे नसल्याने या रस्त्यावरूनही पाणी सतत वाहत असते. पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य पसरले आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 19/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow