संगमेश्वर : आरवलीत सर्विस रोडची चाळण

Jul 20, 2024 - 12:30
Jul 20, 2024 - 13:34
 0
संगमेश्वर : आरवलीत सर्विस रोडची चाळण

सावर्डे : मुंबई-गोवा महामार्गावर आरवली (ता. संगमेश्वर) येथील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूकडील सेवारस्त्याची चाळण झाली आहे, रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, त्यामध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्यांचा अंदाज येत नाही. रस्ता ठिकठिकाणी खचला आहे. वाहने कसरत करत चालवावी लागत आहेत. खराब रस्त्यामुळे एसटी कारगाड्यांचे चालक थांबा असूनही बसगाडया उड्डाणपुलावरून नेणे पसंत करत आहेत. परिणामी, प्रवाशांना बसथांबा असूनही बस थांबत नसल्याने कुचंबना सहन करावी लागत आहे.

चौपदरीकरणामध्ये रस्ते महामंडळाने आरवली येथे माखजन व कुचांबे परिसरासाठी उड्डाणपूल बांधला आहे. पुलाच्या खालून पूर्व बाजूस कुचांबे, मुरडव, कुंभारखाणी बुद्रुक, राजिवली, येडगेवाडीला जाण्यासाठी तर पश्चिमेला कोडिवरे, माखजन, बुरांड, कासे, करजुवे आदी गावांसाठी सेवारस्ता तयार केला आहे. उड्डाणपूल व सेवारस्त्याचे काम पावसाळ्याच्या तोंडावर घाईघाईत केल्याने सेवारस्त्याचा बोजवारा उडला आहे. रस्त्याचे व्यवस्थित मजबुतीकरण झालेले नाही. त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत तसेच योग्य सपाटीकरण नसल्याने अवजड वाहने जीव मुठीत धरून चालवावी लागत आहेत. रस्त्याला नाले काढलेले नाहीत. परिणामी, पावसाचे पाणी रस्त्यावर घेऊन रस्त्याला तलावाचे स्वरूप येते. महामार्गावरील आरवली हे माखजन व कुचांबे परिसरातील २५ जून आधिक गावासाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. इथून एक किमीवर रेल्वेस्थानक असल्याने येथे प्रवासी व वाहनांची सतत वर्दळ असते. इथूनच प्रवासी मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरीला जाण्यासाठी मध्यवर्ती अधिकृत थांब्यावर बसची वाट पाहतात; मात्र रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे अनेकदा एसटी चालक व खासगी वाहनचालक सेवारस्त्याऐवजी उडाणपुलावरून वाहने सुसाट नेतात. यामध्ये प्रवाशांची गैरसोय होते. या सेवारस्त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे.

या रस्त्याबाबत वेळोवेळी स्थानिक आमदार व संबंधित बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. परंतु कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. यामध्ये जनतेला मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
- मंगेश परकर, माजी ग्रामपंचायत सदस्य, आरवती

कोकणात वर्षभरात सरासरी चार हजार मिमी पाऊस पडतो. त्याचा विचार करून रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण व्हायला हवे; मात्र ठेकेदाराने महामार्ग पूर्ण होण्यासाठी घाईत काम केले. किमान स्थानिक आमदार व खासदारांनी लक्ष घालण्याची गरज आहे. - बाबू सावंत, रिक्षाचालक, मुरडव


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:58 PM 20/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow