मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Sep 20, 2024 - 11:15
 0
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता काहीच दिवसात लागण्याची शक्यता असून राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसतंय. काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

संजय पांडे यांची विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा अशून जागावाटपानंतर त्यावर निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे संजय पांडे चर्चेत आले होते. त्यांच्यावर ईडीने खटलाही भरला आहे.

संजय पांडे यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या चार उमेदवारांची घोषणा केली होती. तसेच ते स्वतः वर्सोवा किंवा अंधेरीतून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आता उमेदवारीचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची चर्चा आहे.

निवडणूक लढण्यावर ठाम

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर संजय पांडे म्हणाले की, मी विधानसभा निवडणूक लढवणार हे नक्की आहे. ⁠या संदर्भात पक्ष निर्णय घोईल. ⁠ईडी, सीबीआयचा मी ही व्हिक्टीम आहे. ⁠या संदर्भात कोर्टात केस लढेन. ⁠या प्रकरणाचा आणि काँग्रेस प्रवेश याचा काहीही संबंध नाही. 2004 पासून मला काँग्रेस मध्ये काम करायचं होतं. ⁠मात्र आता वेळ आहे म्हणून मी काम करत आहे. जागावाटपानंतर कोणत्या ठिकाणाहून लढायचं ते ठरवू.

संजय पांडेंची पोस्ट आली होती चर्चेत

दरम्यान, संजय पांडे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केल्याचे म्हटले होते. "कुठलाही पक्ष नाही, पण आम्ही प्रयत्न करू…”, अशी पोस्ट संजय पांडे यांनी केली होती. संजय पांडे यांच्या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

फोन टॅपिंग प्रकरण काय? ( Sanjay Pandey Mumbai Phone Tapping Case)

बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात संजय पांडेंना अटक करण्यात आली होती. संजय पांडे यांच्या कंपनीने जवळपास आठ वर्षे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) कर्मचार्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याची माहिती सीबीआयला (CBI) मिळाली होती. संजय पांडे यांच्या ISEC सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने रेड सर्व्हर नावाच्या उपकरणांचा वापर करून हे फोन टॅप केल्याचा आरोप सीबीआय आणि ईडीने केला होता. याचप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना अटक करण्यात आली होती.

संजय पांडे ज्यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक होते, तेव्हा त्यांनी परमबीर सिंह यांना अनिल देशमुख यांच्याविरोधात तक्रार मागे घेण्यासाठी दबाव निर्माण केला असल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तसेच, NSE सर्व्हर कॉप्रमाईज केस प्रकरणात त्यांना समन्स बजावण्यात आलं होतं.

चित्र रामकृष्णा प्रकरणात एक ऑडिट कंपनी तयार करण्यात आली होती, ही कंपनी संजय पांडे यांची होती. या प्रकरणात बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. तसेच संजय पांडे यांनी 2001 मध्ये आयटी ऑडिट फर्म सुरू केली होती. त्यानंतर जेव्हा त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही तेव्हा ते पुन्हा पोलीस सेवेत आले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाला आणि आईला फर्ममध्ये संचालक केलं.

Isec Services Pvt Ltd नावाच्या फर्मला 2010 आणि 2015 च्या दरम्यान NSE सर्व्हर आणि सिस्टम्सचे IT ऑडिट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. सीबीआय आणि ईडीनं त्यांच्या फर्मची चौकशी सुरू केली होती. चौकशीनंतर संजय पांडेंना अटक करण्यात आली. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 20-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow