चिपळुणात दोन फायर फायटर बुलेट दाखल

Jul 20, 2024 - 14:00
Jul 20, 2024 - 14:07
 0
चिपळुणात दोन फायर फायटर बुलेट दाखल

चिपळूण : येथील पालिकेच्या वाहनताफ्यात दोन फायर फायटर बुलेटची भर पडली आहे. शासनाकडून आलेल्या या दोन आधुनिक मोटरसायकल अग्निशमन विभागात दाखल झाल्या आहेत. या फायर फायटर बुलेटवर फायर फायटिंग सिस्टीम बसवली आहे. त्याला अत्याधुनिक यंत्रणांची जोडही दिली आहे. त्यामुळे छोट्या गल्लीबोळात लागलेली आग नियंत्रण आणण्यासाठी या वाहनांची मोठी मदत होणार आहे.

चिपळूण पालिकेच्या अग्निशमन विभागात सध्या एकच अग्निशमन बंब कार्यरत आहे. शहर व परिसरात तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात आगीच्या घटना घडल्यास हा बंब धावतो. आग नियंत्रणात आणतो; मात्र ज्या परिसरात बंब पोहोचत नाही तेथील आगीवर नियंत्रण मिळवताना अधिकारी, कर्मचारी यांना अडचणींचा सामना करावा लागतो. या गोष्टीचा विचार करून शासनाने आपत्ती व्यवस्थापनांतर्गत चिपळूण नगर पालिकेला दोन फायर फायटर बुलेट दिल्या आहेत. बुधवारी या दोन्ही बुलेट चिपळूण पालिकेत दाखल झाल्या. मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालयीन अधीक्षक अनंत मोरे, अग्निशमन विभागाचे अमोल वीर यांच्यासह सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी या दोन्ही वाहनांची पूजा केली. 

या बुलेट बाइकला मिनी फायर ब्रिगेडचे रूप देण्यात आले आहे. या बुलेटला आवश्यक क्षमतेचे कीट बसवण्यात आले आहे. यामध्ये पाणी व फोमचे मिश्रण भरण्यात आले आहे याशिवाय आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी छोटे व हायटेक उपकरणही बसवले आहे. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ही बुलेट उपयोगी ठरणार आहे. आगीची माहिती मिळताच या बुलेट घटनास्थळी धावणार आहेत. तेथील परिस्थितीची पाहाणी केली जाईल. तेथील आग नियंत्रणाच्या बाहेर जात असल्याचे निदर्शनास येताच तातडीने अग्निशमन बंब मागवला जाणार आहे. ज्या ठिकाणी अग्निशमन बंब पोहोचणार नाही तिथे या फायर फायटर बुलेट फायदेशीर ठरणार आहेत. या मोटर सायकलला फायरब्रिगेडप्रमाणे सायरन बसवला आहे. रस्त्यावरील नागरिकांना सावध करत कमी वेळेत ही मोटारसायकल घटनास्थळी पोहोचणार आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 20/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow