भाजीपाल्याचे दर कडाडले..

Jul 20, 2024 - 17:27
 0
भाजीपाल्याचे दर कडाडले..

रत्नागिरी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यासारख्या योजनांनी महिलांना आर्थिक पाठबळ दिले जात असतानाच भाजीपाला, डाळी, कडधान्यांच्या वाढत्या किमतींमुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत भाजीपाल्याचे दर कडाडले असून पुढील काही दिवसांत त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

बाजारात भाजीसाठी पाव किलोला ३० रुपये लागतात. डाळींनी सव्वाशे रुपयांच्या पुढे मजल मारली आहे. कडधान्यही महागलेली आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर असल्याने तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवकही रोडावलेली आहे. त्यामुळे भाजीचे दरही वधारलेले आहेत. 

वांगी, घेवडी, फ्लॉवर, फुलकोबी, तेंडली, गाजर, काकडी आदीचे दर पाव किलोला तीस रुपये आहेत. टोमॅटो ७० रुपये, तर फरसबी आणि मटारने दोनेशेची मजल गाठली आहे. एका कुटुंबात सरासरी दोन भाज्या दिवसाला होतात. किमान अर्धा किलो भाजी प्रतिदिन लागते. त्यामुळे दोन वेगवेगळ्या भाज्या घ्यायच्या झाल्या तरी दिवसाला शंभर रुपयाची भाजी लागतेच. डाळी आणि कडधान्यांवर दिवस ढकलायचा तरी त्यांच्याही किंमती हाताबाहेर गेल्याने गृहिणींकडून स्वयंपाक करताना हात आखडता घेतला जात आहे. मसाल्याच्या पदार्थांनीही दरात उचल घेतल्याने चमचमीत जेवण बनवण्यापेक्षा पिठलं, लोणच्यावरच दिवस काढले जात आहेत. दहा रुपयांना मिळणारी कोथिंबीर, आले, मिरच्यांचा वाटा आता वीस रुपये झाला आहे. लसणाचे दर दोनशेच्या पुढे असल्याने फोडणीही महागली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:53 20-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow