रत्नागिरी : चांदेराई बाजारपेठेत पाणी घुसले

Jul 22, 2024 - 10:03
Jul 22, 2024 - 10:06
 0
रत्नागिरी : चांदेराई बाजारपेठेत पाणी घुसले

रत्नागिरी : शनिवारी रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने रविवारी दिवसभरही रत्नागिरी तालुक्याला झोडपून काढले. काजळी नदीला आलेल्या पुराचे पाणी हरचिरी, चांदेराई, तोणदे, हातिस, सोमेश्वर भागात घुसले होते. यावर्षी प्रथमच चांदराई पुलावरून पाणी वाहू लागल्याने काजरघाटीमार्गे लांजा होणारी एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. चांदेराई बाजारपेठ पाण्यात गेली होती. पूरस्थितीमुळे चांदेराई, हरचिरी व तीन ते चार गावांचा संपर्क तुटला होता. सांयकाळी ओहटी असतानाही नदीचे पाणी वाढल्यामुळे रात्री भरतीच्या वेळी पाणी आणखी चढण्याची भीती ग्रामस्थांमधून व्यक्त करण्यात येत होती. अंजणारी पुलाला पाणी लागल्याने महामार्गाची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

मागील तीन-चार दिवस सातत्याने तालुक्यात पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी दिवसभर पावसाने जोरदार बँटिंग केल्यानंतर रात्रीही पाऊस तेजीत होता. त्यामुळे लांजा व रत्नागिरी तालुक्यातून वाहणाऱ्या काजळी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. त्यामुळे लांजा रत्नागिरी तालुक्यातून वाहणाऱ्या काजळी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. अंजणारी गावात नदी किनारी असणारे श्री दत्त मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा त्यामुळे गुरुपौर्णिमिनिमित्त आयोजित उत्सव व सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.

काजळी नदी किनारी असणाऱ्या हरचिरी, चांदेराई गावात सकाळी ११ वाजल्यापासूनच पाणी भरु लागले होते. सातत्याने पाणी वाढत असल्याने, चांदराई बाजारपेठेतील व्यावसायिकांनी आपल्या दुकानांमधील साहित्य अन्यत्र हलवले. या भागात स्थानिक ग्रामस्थ पहारा देत होते. पाण्याची पातळी बाजारपेठेत दुपारनंतर तीन ते चार फुटापर्यंत वाढली होती. अगदी चांदेराई पुलावरुनही पाणी वाहू लागले होते यंदा प्रथमच पुलावरुन पाणी वाहिले आहे. यावर्षी गाळ उपसा केल्यामुळे त्याचा फरकही जाणवत होता. चांदेराई पुलावरुन पाणी वाहिल्यामुळे या मार्गावरील एसटीसह सर्वच वाहतूक बंद करण्यात आली होती.

काजळी नदीच्या पुरामुळे नदी किनाऱ्यावर हातिस, तोणदे, सोमेश्वर या भागातील शेतीही पाण्याखाली गेली होती. हातीस येथील पीर बाबरशेख दर्यालाही पाण्याने वेढा घातला होता. तोणदे येथील शंकर मंदिरही पाण्याखाली होते. सोमेश्वर गावात जाणाऱ्या रस्त्यावरुन पाणी जात असल्याने सोमेश्वर, तोणदे, चिंचखरी येथील वाहतुकही बंद ठेवण्यात आली होती. तालुक्यात काही भागात पडझडीच्या घटना घडल्याची नोंद महसूल दप्तरी करण्यात आली आहे.

तहसीलदार यांची घटनास्थळी पाहणी
रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी चांदेराई सोमेश्वर भागात भेट देऊन पाहणी केली व नागरिकांना सुरक्षितस्थळी राहण्याच्या सूचना दिल्या, मंडल अधिकारी आणि तलाठी यांनाही पूरस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. 

चिंद्रवलीतील रस्ताच गेला वाहून... तालुक्यातील चिद्रवली निरखुणे गावात आणारा रस्ता पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना किराणा, भाजीपाला व कामावर जाण्यासाठी चालत जावे लागत आहे. येथील वाहतूकही बंद झाली आहे. चांदेराई बाजारपेठेत जाण्यासाठी तासभर पायपीट करावी लागत आहे. ग्रामपंचायत, तलाठी, रेल्वे प्रशासनाला माहिती देऊनही यंत्रणांनी या ग्रामस्थांकडे दुर्लक्ष केले आहे. 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 22/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow