रत्नागिरी शहरातील तलावातील मासे, कासवांचा अधिवास धोक्यात

May 30, 2024 - 14:38
May 30, 2024 - 14:41
 0
रत्नागिरी शहरातील तलावातील मासे, कासवांचा अधिवास धोक्यात

◼️ शहरातील तलावांची दुरवस्था कायम; शेवाळ, गाळ व कचऱ्यानेच भरले तलाव

रत्नागिरी : शहरातील बहुतांश तलांवाची दुरवस्था झाली असून, यातील काही तलांवातील पाणी आटून खडखडाट पडल्याचे दिसून येत आहे. यामुळे तलावात असलेल्या मासे व कासवांचा अधिवास धोक्यात आला आहे. या तलावांमुळे नजीकच्या विहिरींची पाणीपातळी स्थिर राहते; मात्र तलावातील दूषित पाण्यामुळे आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

शहरातील तेळीआळी, बाजारपेठ, परटवणे तसेच दैवज्ञ भवन नजीकच्या तलावांची दुरवस्था झाली आहे. या तलावांमध्ये शेवाळ, गाळ व कचऱ्याचे साम्राज्य वाढले आहे. यामुळे तलावातील पाणी दूषित झाले आहे. 
तेळीआळी येथील तलावामध्ये केवळ जलचरापुते पाणी शिल्लक राहिलेले दिसून येत आहे. या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात मासे, कासवे पहायला मिळायची; परंतु सध्या तुरळक मासे व कासवे दिसून येत आहेत. पाण्यावर मोठ्या प्रमाणात हिरव्या शेवाळाचा थर साचला आहे. मे महिन्याच्या हंगामामध्ये बच्चे कंपनी या ठिकाणी पोहण्याचा आनंद लुटत असत; मात्र यावेळी या तलावाने तळ गाठल्याचे दिसून येत आहे. हीच परिस्थिती परटवणे येथील तलावाची झाली आहे. याचबरोबर बाजारपेठेतील तलावातील पाणी देखील आटून गेल्याचे चित्र आहे.

दैवज्ञ भवननजीकचे तलाव तर दिवसेंदिवस गाळाने भरत चालल्याचे दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी होते. तसेच तळ्यांचे आकारमान मोठे होते; मात्र गाळ तसेच कचऱ्यामुळे यातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील या तलावांची स्वच्छता करावी तसेच दुरवस्था झालेल्या या तलावांचे संवर्धन करावे, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

तलावांचे संवर्धन करावे
या तलावांबरोबरच शहराचे ग्रामदैवत भैरी मंदिर तसेच काशीविश्वेवर मंदिरानजीक देखील पुरातन तलावे आहेत. या सर्व तलावांचे संवर्धन करावे, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 30/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow