गुहागर : पांगारी तर्फे वेळंब येथील घराचे नुकसान; वृद्धा जखमी

Jul 22, 2024 - 12:02
 0
गुहागर : पांगारी तर्फे वेळंब येथील घराचे नुकसान; वृद्धा जखमी

गुहागर : गुहागर तालुक्यात मुसळधार पावसामुळे पांगारी तर्फे वेळंब येथील सुवर्णा शांताराम खांबे यांच्या राहत्या घराचे पूर्णतः नुकसान झाले असून सुवर्णा यांच्या पायाला दुखापत झाली आहे. तर घराचे १ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे.

या घराची शनिवारी मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या सूचनेनुसार मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, विभाग अध्यक्ष नितीन कारकर यांनी पाहणी करून सदर वृद्ध महिलेची विचारपूस केली. या घरामध्ये महिला एकटीच राहते. मध्यरात्री अचानक कोसळलेल्या घराच्या भिंतीचे दगड अंगावर पडून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे.

यावेळी मनसे गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांनी सांगितले, नुकसानग्रस्त या वृद्ध महिलेला तातडीने रुग्णालयात घेऊन जाणे गरजेचे होते. परंतु प्रशासनाकडून हे झाले नाही. फक्त डॉक्टरांना पाठवून प्राथमिक उपचार करण्यात आले. या संदर्भात तहसीलदार यांच्याशी माझं बोलणं झालं असून ते या संदर्भात येथील तलाठी व ग्रामसेवक यांना या वृद्ध महिलेची भेट घेऊन तातडीने पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देणार आहेत, असे सांगितले. या वृद्ध महिलेला मनसेकडून प्राथमिक आर्थिक मदत करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 22/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow