मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही : ना. उदय सामंत

Jul 24, 2024 - 09:54
Jul 24, 2024 - 09:54
 0
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही : ना. उदय सामंत

रत्नागिरी : महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेपासून एकही महिला वंचित राहणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथे मंगळवारी या योजनेचा तालुकास्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार भास्कर जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे, तहसिलदार परिक्षित पाटील आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, जी योजना चांगली आहे ती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे ही आपली भावना आहे. अशा योजनांचा विकासात्मक आणि विधायक कामांना आमदार भास्कर जाधव यांचे नेहमीच सहकार्य असते. महिलांना आर्थिक ताकद देताना सर्वांनी एकत्र आले पाहिजे हा संदेश आजच्या निमित्ताने सर्वत्र गेला. शासनाच्या विकासात्मक कामात अंगणवाडी सेविकांचा नेहमीच सहभाग राहिला आहे. या योजनेचा लाभ त्यांना मिळणार आहेच शिवाय लाभार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर पन्नास रुपयांचा लाभ देखील मिळणार आहे. वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. शुभमंगल योजनेमध्ये पंचवीस हजार आता मिळणार आहेत.
शासनाच्या या सर्व योजनांची अंमलबजावणी करताना लोकांचे आपण काहीतरी देणं लागतो ही भावना ठेवून आपण काम करावे. आठ दिवसात शंभर टक्के योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा. संजय गांधी निराधार योजनेप्रमाणेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना तहयात सुरु राहील, असेही ते म्हणाले.

आमदार श्री. जाधव म्हणाले, सर्वच शासनाने विकासात्मक काम करताना सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवला आहे. त्यानुसार विविध लाभाच्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. अशा योजनांमधून सर्वसामान्य लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. या योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कुणीही लाभार्थी मागे राहणार नाही यासाठी सर्वांनी सहकार्य करुन आशीर्वाद मिळवावेत.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करुन झाली. लाभार्थी महिलांना यावेळी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत श्री. हावळे यांनी तालुक्याची माहिती दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 24-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow