बेटा अजित कितना खाया? सरदार 70 हजार कोटी...; विजय वडेट्टीवारांनी उडवली खिल्ली

Jul 24, 2024 - 16:56
 0
बेटा अजित कितना खाया? सरदार 70 हजार कोटी...; विजय वडेट्टीवारांनी उडवली खिल्ली

नाशिक : बेटा अजित कितना खाया? सरदार 70 हजार कोटी... बहुत खाया.... ये ले तिजोरी की चाबी रख.... अशा शब्दात आज विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी( PM Modi) यांची खिल्ली उडवत या जोरदार बॅटिंग केली आहे.

विजय वडेट्टीवार हे आज येथील माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त आयोजित शेतकरी मेळाव्या प्रसंगी बोलत होते. या मेळाव्यात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार तोफ डागली. सध्या राज्यात प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. लाडकी बहिण म्हणतात मात्र लाडक्या बहिणीवर सर्वाधिक अत्याचार ह्या महाराष्ट्रात सुरू असल्याचेही ते म्हणाले.

बहुमत असलेल्या पक्षाला आमची गरज काय?

सलाईन लावून उपोषण करण्यात काहीच अर्थ नाही, म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीमधील आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पाचव्या दिवशी जरांगे पाटील यांनी उपोषणाचा निर्णय स्थगित करत उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, पाटील यांनी उपोषणाचा निर्णय मागे घेतला असला, तरी सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही आणि 13 ऑगस्टनंतर आम्ही आमची रणनीती जाहीर करू, असा इशारा सुद्धा जरांगे पाटील यांनी दिला आहे. या विषयी भाष्य करताना विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार तोफ डागली आहे. तर जरांगे यांचे उपोषण स्थगित झाले, आम्ही त्यांचे स्वागत करत असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

मराठा आरक्षण संदर्भात सरकार लेखी आश्वासन देतात, कमिटमेंट करतात. पण पुढे काय? सरकार काय करणार आहे फक्त तारीख पे तारीख सध्या सुरू आहे. विरोधक आमच्या बैठकींना येत नाही म्हणतात, पण मग आमची गरज काय? बहुमत असलेल्या पक्षाला आमची गरज काय, या बाबत तात्काळ निर्णय घ्या. असे म्हणत सरकारने निर्णय घ्यावा आणि या बाबत मराठा समाजाला निर्णय द्यावा.अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

समाजाला न्याय द्या, नाहीतर खुर्च्या सोडा

सरकारने आज दोन्ही समाज आज समोरासमोर उभे केले आहेत. एकाचे नेतृत्व मनोज जरांगे तर एक दुसऱ्याचे नेतृत्व लक्ष्मण हाके करत आहेत. दोन समाजात सरकारने दरी निर्माण केली आहे. मात्र जाती जातीत भांडणे लावून महाराष्ट्राचा विकास होणार नाही. सरकार म्हणून जे करत आहे ते योग्य नाही. परिणामी त्यांनी समाजाला न्याय द्यावा अथवा खुर्च्या सोडाव्या, असा इशारीही विजय वडेट्टीवार यांनी सरकारला दिला आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:24 24-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow