रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन व जनजागृती

Jul 25, 2024 - 12:26
 0
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन व जनजागृती

रत्नागिरी : परिसरात पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करून जल आणि वायू,ध्वनी, प्रदूषण टाळण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी यांनी केले आहे.

रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे अध्यक्ष रूपेश पेडणेकर, सचिव ॲड.मनिष नलावडे एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे हे आवाहन केले आहे.

आपणां सर्वांचा आवडता सण गणेशोत्सव लवकरच येत आहे. सर्वजण या सणाची आतुरतेने वाट पहात आहोत. हा सण साजरा करण्याचे काळानुरूप बदलेले स्वरूप पाहता याबाबत प्रत्येकाने चिंतन करण्याची वेळ आली आहे.

             
गणपती बाप्पा आपणां सर्वांचे लाडके दैवत. याची प्रतिष्ठापना, त्याचे पावित्र्य व पर्यावरण रक्षण यासाठी आपण गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करणे ही काळाची गरज आहे. गणपती अर्थात श्रींच्या मूर्तीची निवड करण्याची आतापासून सुरवात झाली आहे,गणेशोत्सवाचे वेध कोकणात सुरु झाले आहेत.

             
गणपती मूर्ती शाडूच्या मातीने बनवण्याची पारंपरिक पद्धत होती. मात्र अलिकडे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आकर्षक मूर्ती वजनाला तुलनेने कमी असल्यामुळे ती घेण्याकडे लोकांचा कल वाढलेला दिसून येत आहे. परंतु यापासून बनवलेल्या मूर्तीचे विसर्जन केल्यावर सहज व लवकर विरघळत नाहीत. हलक्या असल्यामुळे पाण्याबरोबर इतस्तत: वाहत जातात. मूर्तीचे अवशेष नंतर पालापाचोळ्यात, कचऱ्यात, चिखलात विखुरलेले बघायला मिळतात. आपल्या दैवताची व आपल्या श्रद्धेची एकप्रकारे विटंबनाच बघायला मिळते. शिवाय मोठया प्रमाणात जल आणि वायू, ध्वनी प्रदूषण होते .यामुळे जैव विविधतेला हानी पोहोचते. हे आपण आता थांबवायला हवे. शाडू मूर्ती किंवा कागदाच्या लगद्यापासून लहान आकाराच्या पर्यावरणपूरक मूर्तीच घ्यायला हवी. निसर्गाचे संगोपन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने ओळखायला हवी.

              
गणेशोत्सवसाठी सजावटीला थर्माकोल, प्लास्टिकचा वापरही टाळायला हवा.ध्वनी प्रदूषण टाळून शांततापूर्ण वातावरणात हा उत्सव साजरा केल्यास पर्यावरण हानी टाळून खऱ्या अर्थाने मनःशांती लाभेल व गणेशोत्सव एक आनंदोत्सव होईल. चला तर मग साजरा करू या यंदाचा गणेशोत्सव इकोफ्रेंडली गणेशोत्सव असे आवाहन रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी यांनी केले असून रत्नागिरी परिसरात जनजागृती मोहीम सुरू केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 25-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow