उद्योजकांसाठी खेड, रत्नागिरी रेल्वेस्थानकात सुविधा : कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोषकुमार झा

Jul 25, 2024 - 11:14
Jul 25, 2024 - 14:57
 0
उद्योजकांसाठी खेड, रत्नागिरी रेल्वेस्थानकात सुविधा : कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोषकुमार झा

रत्नागिरी : औद्योगिक क्षेत्रात तयार होणारी विविध उत्पादने कोकण रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी कोकण रेल्वे आणि कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने खेड आणि रत्नागिरी रेल्वेस्थानकात आवश्यक त्या सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोकण रेल्वेने मुंबई येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये व्यापार मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोषकुमार झा, महाप्रित, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि प्रमुख शिपिंग लाईन्सचे वरिष्ठस्तरावरील प्रतिनिधी यांच्यासह ७५ प्रमुख उद्योजकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या प्रसंगी कोरेचे अध्यक्ष झा यांनी खेड आणि रत्नागिरी टर्मिनन्समधून कंटेनर वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. माल साठवून ठेवण्यासाठी जागा, कोल्डस्टोरेज यासह पायाभूत सुविधा दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोकण रेल्वे मार्गावर विविध पायाभूत विकास प्रकल्पांची कामे सुरू आहेत. काही ठिकाणे व्यावसायिकांसाठी उपलब्ध करून दिल्या जातील असेही झा यांनी सांगितले, कंटेनर कॉर्पोरेशनचे ए. के. सिंग यांनी खेड आणि रत्नागिरीतील व्यावसायिकांना रेल्वे वाहतुकीतून मिळणारे फायदे याबदल माहिती दिली. मूल्यवर्धित सेवा आणि सुविधांविषयोही त्यांनी व्यावसायिकांना माहीती दिली.

मुंबईत झालेल्या बैठकीत उपस्थित व्यापाऱ्यांनी सध्याच्या बदलत्या परिस्थितीवर आधारित काही प्रश्न उपस्थित केले. रत्नागिरी आणि खेडमधील कंटेनर ऑपरेशन्स सुरळीत करण्यासाठी आणि कंटेनर वाहतुकीच्या वाढीला चालना देण्यासाठी कोकण रेल्वे सकारात्मक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow