चिपळूणात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज काढून फसवणूक

Jul 29, 2024 - 11:08
Jul 29, 2024 - 13:49
 0
चिपळूणात  शेतकऱ्यांच्या नावे कर्ज काढून  फसवणूक

चिपळूण : तालुक्यातील मालदोली, भिले, भोम आणि कालुस्ते या चार सहकारी सोसायट्यांमध्ये सुमारे ५५ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. ही चौकशी सुरू असतानाच काही सभासदांच्या नावे बोगस कर्ज प्रकरणे केल्याचा धक्कादायक प्रकारही पुढे येत आहे. या प्रकरणातील बोगस कर्जाची चौकशी व्हावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे. अनेक स्थानिक शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज प्रकरणे रंगविली असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

तालुक्यातील खाडीपट्ट्यातील भिले, भोम, कालुस्ते आणि मालदोली या चार विविध सहकारी सोसायट्यांमध्ये मोठ्या स्वरूपात उलाढाल होते. या सोसायट्यांमध्ये सभासद संख्याही मोठी आहे. परंतु, आता या सहकारी सोसायट्यामधील ५५ लाखांची रक्कम सचिव योगेश प्रमोद भोवेकर याने वैयक्तिक कारणासाठी वापरली. तशी लेखी कबुली सहायक निबंधकांच्या चौकशीत दिली आहे. अजूनही या प्रकरणी चौकशी सुरू आहे. मात्र, या चारही सोसायट्यांचे दप्तर गायब असल्याने चौकशीत अडचणी येऊ लागल्या आहेत. 

या चार गावांमधील शेतकऱ्यांना खावटी कर्जासाठी तसेच बी-बियाणे, खते, अवजारे, जनावरे व अन्य खरेदीसाठी सोसायटी मार्फत कर्ज दिले आहे. मात्र, यातील काही कर्जे बोगस असल्याची चर्चा सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांना कर्जाची आवश्यकता आहे, अशांकडून भोबेकर कर्जासाठी आवश्यक ती कागदपत्रे घ्यायचा. त्याचवेळी बँकेतून पैसे काढण्याच्या स्लिपवर देखील तो सबंधीत व्यक्तीकडून सह्या घ्यायचा. त्या आधारेबँकेत कागदपत्रे जमा करून रक्कम काढली जायची. सबंधित लोकांनी कर्जाची विचारणा केल्यास नामंजूर झाल्याचे सांगितले जायचे. काही सभासदांनी पोलिस स्थानकात तक्रार देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांची रक्कम तातडीने अदा केल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे. संचालक मंडळ, सभासद यांच्यात अनेक बैठका झाल्या. दप्परच नसल्याने नेमका गैरव्यवहार किती रूपयांचा हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे सहायक निबंधक तहसीलदरांच्या अहवालाची प्रतिक्षा करीत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:36 PM 29/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow