सायबर गुन्ह्यांमुळे दररोज ३ हजार कोटींची फसवणूक : सायबर तज्ज्ञ डॉ. मकरंद वाघ

Jul 29, 2024 - 12:55
Jul 29, 2024 - 16:57
 0
सायबर गुन्ह्यांमुळे दररोज ३ हजार कोटींची फसवणूक : सायबर तज्ज्ञ डॉ. मकरंद वाघ

राजापूर : देशात दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये २० टक्के हे टेक्निकल रूपातील तर ८० टक्के सायकॉलॉजिकली गुन्हे घडत असून यातूनच प्रत्येक दिवशी भारतात सुमारे ३ हजार कोटींची फसवणूक होत आहे. देशात हॅकर्सकडून फसवणुकीच्या अनेक घटना घडत आहेत. वाढते सायबर गुन्हे लक्षात घेता सावधानता बाळगणे आवश्यक आहे. स्वतःला वाचवायचे असेल तर प्रत्येकाने अलर्ट व्हावे लागेल. आपल्याला आलेले अनोळखी कॉल न स्वीकारणे किंवा तो नंबर बंद करणे. चुकीच्या घटनांना बळी न पडणे, याकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. जर कुठे सायबरशी संबंधित गुन्हे घडत असतील तर तत्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला याबद्दल तक्रार करावी, असे आवाहन सायबर तज्ज्ञ आणि मुंबईचे माजी पोलीस अधिकारी डॉ. मकरंद वाघ यांनी राजापूर येथे केले.

सायबर सुरक्षा आणि डिजिटल फॉरेन्सिकचे अनन्यसाधारण महत्त्व या विषयावर ते बोलत होते. राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने आयोजित आणि राजापूर नगर वाचनालयाच्या सौजन्याने बिझनेस मोट २०२४ हा कार्यक्रम राजापूर नगर वाचनालयात पार पडला, त्यावेळी प्रमुख वक्ते मुंबईचे माजी पोलीस अधिकारी डॉ. मकरंद वाघ यांच्यासह महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स फेडरेशन मुंबईचे संचालक मिलिंद आरोलकर, राजापूर अर्बन बँकेच्या चेअरमन अनामिका जाधव, व्हाईस चेअरमन विवेक गादीकर, माजी चेअरमन जयंत अभ्यंकर, बँकेचे सीईओ शेखर कुमार अहिरे, राजापूर नगर वाचनालयाचे अध्यक्ष प्रभात पाध्ये, महादेव ठाकूर देसाई यांसह बँक व्यवस्थापनाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशातील वाढत्या सायबर गुन्ह्यांवर प्रकाशझोत टाकताना डॉ. वाघ यांनी सायबर गुन्ह्याशी संबंधित उघडकीस आणलेल्या काही प्रकरणांची माहिती दिली. सायबर गुन्ह्याची सुरुवात कशी होते.. इथपासून हँकसचे कारनामे... होणारे डिजिटल व्यवहार केले. यावर मार्गदर्शन केले.

शासन कोणाकडेही कॉल करून कागदपत्रे मागवत नाही. आपली कागदपत्रे कुठे पाठवायची असतील तर जागरूक रहा, असे त्यांनी आवाहन केले. यावेळी त्यांनी बोलताना मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप याचा वापर करताना घ्यावयाची काळजी यावर माहिती दिली. बँकेशी संबंधित होणारी कर्ज फसवणूक, गुंतवणूकदार फसवणूक, ओळख चोरी याबाबत खबरदारी कशी घ्यायची त्याची माहिती दिली.

कोणालाही समजणार नाही अशा पद्धतीनेच पासवर्डचा वापर केला जावा. ते सांगताना सुरक्षितत्ता म्हणून आपला पासवर्ड सतत बदलता ठेवा असे त्यांनी आवाहन केले. लहान मुले मोबाईल किंवा कॉम्प्युटर वापरत असतील तर काळजी कशी घ्यायची त्यावरही डॉ. वाघ यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स फेडरेशन मुंबईचे संचालक मिलिंद आरोलकर यांनी राजापूर अर्बन बँकेविषयी गौरवोद्‌गार काढले. मागील काही वर्षे बँकेने ठेवलेला एनपीएचा शून्य टक्के रेट कौतुकास्पद असून राजापूर सारख्या ग्रामीण भागात सहकार क्षेत्रात मागील शंभर वर्षे एक बँक मोठी झेप घेते. हे पथदर्शक आहे. या शब्दात त्यांनी बँकेचे कौतुक केले. यापुढे बँकेने डिजिटल मीडियाचा वापर करावा, असे त्यांनी आवाहन  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी चेअरमन जयंत अभ्यंकर यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:15 PM 29/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow