वाघबीळ घाटात महामार्गाची बाजूपट्टी खचली

Jul 30, 2024 - 12:21
 0
वाघबीळ घाटात महामार्गाची बाजूपट्टी खचली

पन्हाळा : कोकणाशी जोडणाऱ्या नागपूर - रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील वाघबीळ घाटात पुलाचे काम सुरू आहे. या वळणावर दरीच्या बाजूला मोठ्या प्रमाणात केलेल्या उत्खननामुळे रस्त्याला लागून असलेल्या दरीच्या दिशेने रस्त्याची अंदाजे शंभर ते दीडशे मीटर लांबीची बाजूपट्टी खचली आहे.

याबाबत 'वाघबीळ घाटात भूस्खलनाचा धोका' असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर ठेकेदाराने मलमपट्टी केली होती. ही मलमपट्टी कुचकामी ठरली आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस पडत आहे.

त्यामुळे घटाच्या वाघाबीळ बसथांब्यावरून कोल्हापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुरुवातीला मोठे वळण आहे. वळणावर महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी दरीच्या व टेकडीच्या बाजूलाही मोठ्या प्रमाणात उत्खनन केले आहे. त्यामुळे येथील जुन्या रस्त्याची बाजूपट्टी संरक्षक भिंतीसह दरीत ढासळू लागली आहे. त्यामुळे हा मार्ग बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या भूस्खलनामुळे रस्ता खचून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

डोंगरात मुरणाऱ्या पाण्यामुळे दरीच्या उतारावरील माती घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. भूस्खलन होऊन रस्त्याच्या वळणापासून बाजूपट्टी व त्यावरील संरक्षक भिंतीसह तुटून गेली आहे. येथे ढसाळलेली माती भूस्खलन थांबवण्यासाठी लावलेल्या लोखंडी प्लेटसह दरीकडे घसरली आहे. त्यामुळे या ठिकाणी ठेकेदाराने केलेली तात्पुरती उपाययोजना कुचकामी ठरली आहे.

अंदाजे शंभर ते दीडशे मीटर लांबीची बाजूपट्टी त्यावरील संरक्षक भिंतीसह दरीच्या बाजूला कलली आहे. घाटातील सर्वात मोठ्या वळणावरील बाजूपट्टी तुटली आहे. येथून ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्ता खचून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 30-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow