रत्नागिरी : भात पिकावर कीडरोगाचा प्रादुर्भाव

Jul 30, 2024 - 15:06
Jul 30, 2024 - 15:13
 0
रत्नागिरी : भात पिकावर कीडरोगाचा प्रादुर्भाव

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या आठवडाभर पावसाचा जोर होता. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा ओसरलेला आहे. अशा स्थितीत पिकस्थिती सुस्थितीत राखण्यासाठी शेतकऱ्यांना कीडरोगाचा प्रादुर्भाव रोखण्याचे संकट आता शेतकऱ्यांपुढे आहे. दमट वातावरणात पिकावर करपा, नीळे भुगरे गदमाशी याचा मोठ्या प्राणावर वावर होत असल्याने सर्वप्रथम भात खाचरातील पाण्याचा निचरा करणे आवश्यक आहे. कीडरोगाचा प्रादुर्भाव आढळताच, कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने उपाययोजना कराव्यात असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगरे यांनी केले आहे.

साधारमपणे श्रावणात पाऊस सरीवर सुरू झाला की, भात पिकावर करपा, कडा करपा, शेंडे करपा, पर्णकोष करपा, आभासमय काजळी, उदबत्ता, तपकिरी ठिपके या बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. जुलैच्या पहिल्या तीन आठवड्यात पावसाचा जोर होता. सतत ढगाळ असल्यामुळे कीडरोग बळावण्याचा धोका आहे. सध्या पाने गुंडाळणारी अळी, नीळे भुंगेरे यांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे.

जिल्ह्यात ७८ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येते. या वर्षी पाऊस सुरू झाल्याने पेरणी वेळेवर झाली, शिवाय पावसावर अवलंबून शेती असल्याने लागवडही वेळेवर पूर्ण झाली. मात्र, लागवडीपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भात खाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत. अनेक भात लागवड केलेल्या क्षेत्रात रोपांच्या वरून पाण्याचा प्रवाह वाहत आहे. वरकस, निचरा होणाऱ्या क्षेत्रातील भात रोपांची वाढ चांगली झाली आहे.
नदीकिनाऱ्यालगतच्या क्षेत्रात पुराच्या पाण्यामुळे माती, दगड लागवड केलेल्या खाचरात जमा झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

मात्र अशा स्थितीत भातातील खाचराचे पाणि नियोजन होणे आवश्यक आहे. ज्या क्षेत्रात निचरा करणे शक्य आहे, तेथे शेतकऱ्यांनी तातडीने करावा, पाणी भरलेल्या क्षेत्रात निळेभुंगेरे, पाने गुंडाळणारी अळी, उंट अळी, करपा, तुडतुड्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकाची वाढ खुंटण्याची शक्यता असते. फुटवे येण्याची प्रक्रिया थांबण्याची भीती असते. त्यासाठी कृषी सहाय्यकांच्या मार्गदर्शनाखाली पीक पाहणी करण्याच्या सूचना कृषी विभागाने केल्या आहेत. भात खाचरातील पाण्याचा निचरा करणे आवश्यक आहे. कीडरोगाचा प्रादुर्भाव आढळताच, कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने उपाययोजना कराव्यात असे आवाहन करण्यात आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:34 PM 30/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow