ग्रामपंचायतींच्या अधिकारांवर गदा आणू नका; चिपळूणात सरपंच संघटनेची बैठक

Jul 31, 2024 - 11:21
Jul 31, 2024 - 15:24
 0
ग्रामपंचायतींच्या अधिकारांवर गदा आणू नका; चिपळूणात सरपंच संघटनेची बैठक

चिपळूण : ग्रामपंचायतीने कशा पद्धतीने कामकाज करावे याबाबत शासनाने ग्रामपंचायत कामकाजाबाबत नियमावली लागू केली आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीमधील सरपंच व सदस्यांना अनेक अधिकार बहाल केले आहेत. अधिकाऱ्यांनी लाभासाठी ग्रामपंचायतींच्या अधिकारांवर गदा आणू नये, असा एकमुखी ठराव चिपळूण तालुका सरपंच संघटनेच्या बैठकीत करण्यात आला. येथील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात चिपळूण तालुका सरपंच संघटनेची बैठक अध्यक्ष योगेश शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली झाली. गेल्या काही महिन्यांपासून येथील प्रमुख अधिकारी ग्रामपंचायतीच्या कामकाजात विशेषतः वस्तू खरेदीत ढवळाढवळ करत आहेत. चढ्या दराने शिवप्रतिमा खरेदी करण्यासाठी देखील ग्रामपंचायतीवर दबाव टाकण्यात आला; मात्र सरपंच संघटनेने ठाम विरोध केल्यानंतर एकमुखी खरेदीचा प्रयत्न फसला. या प्रकरणाचे पडसाद सोमवारी पंचायत समितीत झालेल्या सरपंच संघटनेच्या बैठकीत उमटले, विकास कामे नियमानुसार कोणाला द्यायची, वस्तू कोठून घ्यायच्या याचे अधिकार ग्रामपंचायतीला आहेत.

परजिल्ह्यातील ठेकेदार आणून येथील ग्रामपंचायतीवर त्यांना लादू नये, असे ठणकावण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेतून तालुक्यात शेकडो घरे मंजूर झाली. मंजूर घरे पूर्ण करण्यासाठी पंचायत समितीने तगादा लावला. आता घरे पूर्ण होत आलो तरी अनुदान लाभार्थ्यांच्या बैंक खात्यावर जमा होत नाही. सातत्याने पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचे ठरवण्यात आले. सरपंचांच्या मागण्यांबाबत येथील स्थानिक आमदारांनी अधिवेशनात आवाज उठवायला हवा होता; पण तसे झाले नाही.

आगामी काळात तरी आवाज उठवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी सरपंच संघटनेचे सचिव विकास गमरे, विस्तार अधिकारी भास्कर कांबळे, स्वप्नील कांबळे, डी. वाय. कांबळे, मिलिंद केळस्कर आदींसह सरपंच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबईत सरपंत संघटनेचा महामोर्चा
पंधरावा वित्त आयोगातील कामे बदलाचा अधिकार जिल्हा परिषदेस आहे. हे अधिकार तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांना देण्याची मागणी करण्यात आली. मुंबईत राज्यातील सरपंच संघटनेचा महामोर्चा काढण्यात येणार असून, त्यात सर्वांनी सहभागी होण्याचे ठरवण्यात आले. या निमित्ताने गटविकास अधिकारी उमा घार्गे-पाटील यांनी सरपंचाचे अधिकार व कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:49 PM 31/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow