रत्नागिरी : प्रतिदिन ९० हजार खर्च असलेली 'रामभद्रा' केवळ शोभेची..?

Jun 1, 2024 - 11:14
Jun 1, 2024 - 11:19
 0
रत्नागिरी : प्रतिदिन ९० हजार खर्च असलेली 'रामभद्रा' केवळ शोभेची..?

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र क्षेत्रातील अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्यासाठी आलेली अद्ययावत रामभद्रा गस्ती नौका कारवाईबाबत अपयशी ठरली. या नौकेच्या मदतीने सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाला एकही कारवाई करता आली नाही. मच्छीमार नौकांच्या उंचीपेक्षा या गस्ती नौकेची उंची कमी असल्याने मासेमारी नौकेत चढून तपासणी करणे शक्य होत नाही, त्यामुळे प्रतिदिन ९० हजार रुपये भाडे असलेली ही गस्ती नौका केवळ शोभेची ठरली आहे.

रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र क्षेत्रात अवैध मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाने अद्ययावत गस्ती नौका दिली. सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाचे गस्ती पथक या नौकेतून समुद्रात कारवाईसाठी फिरत होते. परंतु रामभद्रा गस्ती नौका फायबरची असल्याने ती लाटांच्या मान्याने हेलकावे खाते. त्याचवेळी या गस्ती नौकेचा आकार आणि उंची मच्छीमार नौकांपेक्षा फारच कमी असल्याने गस्ती नौकेतून मच्छीमार नौकेत जाणे धोकादायक होते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात आलेल्या वा नौकेच्या मदतीने एकही कारवाई करता आली नाही.

गस्ती नौका वजनाने हलकी असल्याने ती लाटांवर हेलकावे खात असल्याने गस्ती पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना उलटीचा त्रास जाणवला. त्याचबरोबर कराराप्रमाणे या गस्ती नौकेत योग्य अशा जेवणाचे नियोजनही नव्हते. रामभद्रा गस्ती नौका महिन्यातून २४ दिवस समुद्रात फिरणे बंधनकारक होते, परंतु अनेक बिघाडामुळे ही नौका बंद ठेवावी लागत होती. करारातील तरतुदीनुसार दुसऱ्या पर्यायी गस्ती नौकेचीही उपलब्धता करून देण्यात आली नव्हती. त्यामुळे ही गस्ती नौका कारवाईच्या बाबतीत कुचकामी ठरली.

मत्स्य व्यवसाय विभागाच्या आयुक्त कार्यालयाकडून ही रामभद्रा गस्ती नौका देण्यात आली होती. मासेमारीच्या मोसमात या गस्ती नौकेचा प्रतिदिन ९० हजार रुपये भाडे खर्चाच्या तुलनेत काहीच उपयोग न झाल्याने आयुक्त कार्यालयाने पुढच्या मासेमारी मोसमात याची दखल घेणे आवश्यक आहे.

जुन्या गस्ती नौकेने मिळवून दिले ५० लाख
जुनी 'साई माऊली' गस्ती नौका ही मासेमारी नौकाच होती. या नौकेला दररोज १८ हजार रुपये भाडे होते. या नौकेच्या सहाय्याने सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने ४३ कारवायांमध्ये ८० लाख रुपयांच्या दंडाची कारवाई केली. त्यातील ५० लाख रुपयांचा दंड वसूलही झाला आहे.

स्वमालकीची गस्ती नौका घेऊ शकतात...
रामभद्रा गस्ती नौकेचे भाडे प्रतिदिन ९० हजार रुपये इतके आहे. अद्ययावत मासेमारी नौका बांधणीसाठी ५० ते ६० लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे जो गस्ती नौकेच्या भाड्धाचा खर्च आला आहे त्या सहा महिन्यातील भाडयाच्या रकमेत मस्त्य व्यवसाय स्वतःच्या मालकीची गस्ती नौका बांधणी होऊ शकते, याकडे मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाने गांभियनि पाहण्याची गरज आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 01/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow