बांगलादेशपासून राज्य सरकारने धडा घ्यावा : मनोज जरांगे पाटील

Aug 6, 2024 - 15:59
 0
बांगलादेशपासून राज्य सरकारने धडा घ्यावा : मनोज जरांगे पाटील

जालना : आरक्षण हा प्रचंड मोठा आक्रोश आहे, सर्वसामान्यांना त्रास दिल्यावर काय होतं हे बांगलादेशात दिसलं. त्यामुळे राज्य सरकारने त्यापासून काहीतरी धडा घेतला पाहिजे असं मनोज जरांगे ( Manoj Jarange) म्हणाले.

बांगलादेशच्या सत्ताधाऱ्यांपेक्षा जास्त मस्ती ही राज्य सरकारमध्ये आहे, त्यांना राज्यात दंगली व्हाव्यात असं वाटतंय असा आरोपही त्यांनी केला. मनोज जरांगे जालन्यात बोलत होते.

मनोज जरांगे म्हणाले की, आरक्षणाची किंमत गोरगरिबांनाच कळते, सरकारला याची किंमत कळणार नाही. बांगलादेशचे सत्ताधारी गोरगरिबांशी ज्याप्रमाणे वागले, त्यामुळे आजची परिस्थिती निर्माण झालीय. बांगलादेशच्या सत्ताधाऱ्यांपेक्षा जास्त मस्ती ही राज्यातील सत्ताधाऱ्यांमध्ये आहे. त्यांना राज्यात दंगली व्हाव्यात असं वाटतंय. पण त्यांचा हा हेतू साध्य होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत राज्यात दंगली होऊ देणार नाही.

आमचेच मराठे नेते आमच्या अंगावर घातले जातात असा आरोप करत मनोज जरांगे म्हणाले की, राज्य सरकारने काहीतरी धडा घ्यावा आणि गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्यावं. श्रीमंत राजकारण्यांनी यावर विचार करावा, सत्तेच्या मस्तीत राहू नये.

प्रकाश आंबेडकरांनी भावना समजून घ्यावी

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेवर मनोज जरांगे यानी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मी प्रकाश आंबेडकरांचा आदर करतो, त्यांनी आमची हाक ऐकली पाहिजे. गोरगरिबांना वाटत आहे की राजकारण्यांना पायाखाली दाबायची संधी आली आहे. गरिबांच्या नेत्यांनी एका बाजूला राहिलं पाहिजे. गोरगरिबाला सत्तेत जायची एवढीच संधी आहे, आणि ही भावना मी प्रकाश आंबेडकरांपर्यंत पोहोचवत आहे. त्यांनी भावना समजून घ्यावी.

आंदोलकांनी कुणालाही किंमत देऊ नये

राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांच्यावर टीका केली होती. त्यावर जरांगे यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता प्रत्युत्तर दिलं. आंदोलकांनी कोणालाही किंमत देऊ नये, त्यांच्यापुढे आंदोलन करण्याचे आणि त्यांना भेटायची काय गरज आहे, असा सवालही जरांगेंननी केलाय. गोरगरीब जनतेशी खेळणारे लोक असून आरक्षण कशासाठी लागतं हे त्यांना माहिती नाही असंही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:28 06-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow