राजापूर : झाडी हटविण्यासाठी शिडी वाहन द्यावे : अरविंद लांजेकर

Aug 6, 2024 - 10:04
Aug 6, 2024 - 17:05
 0
राजापूर : झाडी हटविण्यासाठी शिडी वाहन द्यावे : अरविंद लांजेकर

राजापूर : वेगवान वाऱ्यामुळे झाडे पडून वीजवाहिन्यांसह विजेचे खांब तुटल्यामुळे तालुक्यातील अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी वाहिन्यांवर वाढलेल्या झाडीमुळेही अडथळे निर्माण होतात. ती झाडी तोडण्यासाठी तालुक्याला शिडी वाहन, मनुष्यबळ उचलणारी क्रेन मिळावी, अशी मागणी भाजपा युवामोर्चा तालुकाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गेल्या दोन महिन्यात झालेल्या वादळ व पावसामुळे तालुक्यातील बहुतांश भागात वीजवाहिन्यांवर झाडे तसेच झाडाच्या फांद्या पडून वीजवाहिन्या तसेच वीजखांब तुटले आहेत. त्यामध्ये महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक गावात वीजपुरवठा खंडित आहे. वीजवाहिन्या व वीजखांब तुटल्याने वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. राजापूर तालुका हा डोंगरदऱ्या आणि जंगल परिसरात वसलेला असून, वीजवाहिन्या जंगलभागातून गेलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त महावितरण विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. या स्थितीमध्ये पावसाळ्यापूर्वी सर्वच वीजवाहिन्यांवर वाढलेली झाडी तोडणे अवघड बनते तसेच आवश्यक साधनसामुग्रीअभावी वादळी पावसात वीजवाहिन्या तुटल्यानंतर त्या जोडण्यास विलंब होता. त्यामुळे तालुक्यासाठी शिडी वाहन व मनुष्यबळ उचलण्यासाठी क्रेन उपलब्ध झाल्यास महावितरणची कामे जलदगतीने होऊन खंडित झालेला वीजपुरवठा लवकरात लवकर सुरू होण्यास मदत होईल, असे लांजेकर यांनी या निवेदनात नमूद केले आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:32 PM 06/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow