परदेशी पर्यटकासाठी पूरक प्रकल्प रत्नागिरीत

Aug 7, 2024 - 17:25
 0
परदेशी पर्यटकासाठी पूरक प्रकल्प रत्नागिरीत

रत्नागिरी : रत्नागिरी विकासाच्या आणि पर्यटनच्यादृष्टीने काय काय आहे हे मिनी आर्ट गॅलरीच्या माध्यमातून १५ ऑगस्टला उद्‍घाटन करण्यात येणार आहे. परदेशी पर्यटकासाठी पूरक प्रकल्प रत्नागिरीत सुरू करण्यावर भर आहे. राणीच्या बागेनंतरचा पेंग्विन रत्नागिरीतील प्राणी संग्रहालयात असेल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले तसेच विरोधक गरजेचे आहेत. मी विरोधकांशी चर्चा करून मार्ग काढणारा मंत्री आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

रत्नागिरी शहरातील प्रभाग २ येथील सभेप्रसंगी पालकमंत्री सामंत बोलत होते. पालकमंत्री सामंत म्हणाले, रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले आहे; मात्र विकास करताना रत्नागिरी शहरालाही तेवढेच प्राधान्य दिले आहे. काही दिवसात महाराष्ट्राच्या नकाशात रत्नागिरीचे नाव उजळताना दिसेल. या प्रभागातील माजी नगरसेवक स्मितल पावसकर आणि निमेश नायर यांच्या तिकिटाचा नक्कीच विचार केला जाईल; मात्र माझी निवडणूक त्यांच्या अगोदर आहे त्यामुळे भरघोस मते या प्रभागातील नागरिक करतील, याचा विश्वास आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारने विविध योजना आणल्या. त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा. लोकसभेच्या निवडणुकीत खोटा प्रचार करून मुस्लिम आणि दलित बांधवांना भडकवण्यात आले त्यामुळे विरोधात मतदान झाले. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत देशाचे संविधान बदलले जाणार नाही. कोणत्याही मुस्लिम समाजाला देशाच्या बाहेर काढले जाणार नाही. जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम सुरू आहे. रत्नागिरी हा एकमेव जिल्हा असेल की, या जिल्ह्यात असणाऱ्या सर्व समाजबांधवांना एमआयडीसीतील ३ गुंठे जागेत सभागृह होणार आहेत. 

जगातील पहिले छत्रपती शिवाजी महाराज रिसर्च सेंटर दुसरं कुठे नाही. रत्नागिरीत अरबी समुद्रात उभा असेल असा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा रत्नागिरीत होईल, असेही त्यांनी या प्रसंगी सांगितले.

या वेळी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, उपजिल्हाप्रमुख राजन शेट्ये, माजी नगरसेविका स्मितल पावसकर, उद्योजक भाऊ देसाई, शहरप्रमुख बिपिन बंदरकर, माजी नगरसेवक निमेश नायर, अभिजित दुडिये तसेच समस्त प्रभाग क्र. २ मधील नागरिक, महिला वर्ग, युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


रत्नागिरी शहरातील रस्त्यांना खड्डे आहेत हे नाकारता येत नाही; मात्र झालेला पाऊस याला कारणीभूत आहे. या नैसर्गिक आपत्तीला आपण स्वीकारले पाहिजे. दुसरीकडे रत्नागिरीकरांना काँक्रिटीकरणाचे दिलेले आश्वासन प्रामाणिकपणे पार पाडले असून, त्यातील काही काम पूर्णही झाले आहे. विरोधकांनी बोंबा मारल्या तरीही तुमचा आशीर्वाद मिळणार हे नक्की आहे, असे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:53 07-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow