चिपळूणातील ग्रॅव्हिटी पाणी योजना मे २०२५ अखेर पूर्णत्वाचा प्रयत्न

Sep 11, 2024 - 16:09
Sep 11, 2024 - 16:25
 0
चिपळूणातील ग्रॅव्हिटी पाणी योजना मे २०२५ अखेर पूर्णत्वाचा प्रयत्न

चिपळूण : शहराच्या ग्रॅव्हिटी पाणी योजनेसाठी अखेर निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. जीएसटी व अन्य कर वगळून सुमारे १२५ कोटी ३५ लाख रुपयांची निविदा शनिवारी प्रसिद्ध करण्यात आली. २६ सप्टेंबरपर्यंत या निविदेची मुदत असून त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. मे २०२५ अखेर शहरातील नागरिकांनी ग्रॅव्हिटी योजनेतून पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.

तब्बल १५ वर्षे शहरात कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटी पाणी योजना राबविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सुरुवातीला माजी आ. रमेश कदम यांनी या योजनेसाठी प्रयत्न केले. तत्कालीन पाटबंधारे मंत्री सुनिल तटकरे यांनी कोळकेवाडी धरणातून पाणी उचलण्यास मान्यता दिली. तसा कायदेशीर करार देखील चिपळूण नगर परिषद व पाटबंधारे विभागात झाला. त्यानंतर योजनेसाठी सरव्हे करून त्याचा अहवाल संबंधिताकडे पाठवण्यात आला. तसेच या योजनेची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे सोपवण्यात आली. योजनेसाठी आवश्यक साठवण टाकी व त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेची तरतूद करण्यात आली. 

अखेर आमदार शेखर निकम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न केल्यानंतर या योजनेच्या १६० कोटींच्या आराखड्याला तांत्रिक मंजुरी मिळाली होती. त्यानंतर खऱ्याअथनि या योजनेच्या प्रक्रीयेला चालना मिळाली. त्यानंतर १५५ कोटी ८४ लाख रूपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने या योजनेचा मार्ग मोकळा झाला. त्याप्रमाणे सर्व कर वगळून १२५ कोटींची पाणी योजनेची निविदा प्रसिद्ध केली आहे.

सद्यःस्थितीत नगर परिषदेच्या पाणी योजनेसाठी वीज बिलाकरिता सुमारे साडेतीन कोटी रूपये इतका खर्च येत आहे. कोळकेवाडी धरणाच्या १३२ मीटर उंचीवर असलेल्या आऊटलेटमधून पाणी उचलले जाणार आहे. त्यानंतर खेर्डी येथे १०२ मीटर उंचीवर असलेल्या नियोजित साठवण टाकीत हे पाणी आणले जाणार आहे. तेथून पुढे खेर्डी, डीबीजे महाविद्यालय, पाग, गुहागर बायपास व गोवळकोट येथील साठवण टाकीत ग्रॅव्हीटीने पाणी पुरवठा केला जाणार आहे. तसेच शहरातही पाच ते सहा मजल्यावर ग्रॅव्हिटीने पाणी पुरवठा होईल, असे नियोजन केले जाणार आहे. धरणापासून शहरात ७० एमएमची पाईपलाईन टाकली जाणार आहे. खेर्डी येथील डोंगरमाथ्यावर असलेल्या १०० गुंठे जागेत जलशुद्धीकरण प्रकल्प नव्याने उभारण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:37 PM 9/11/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow