रत्नागिरी : बुद्धिबळ स्पर्धेत ओंकार सावर्डेकरने पटकावले अजिंक्यपद

Aug 9, 2024 - 11:54
 0
रत्नागिरी : बुद्धिबळ स्पर्धेत ओंकार सावर्डेकरने पटकावले अजिंक्यपद

त्नागिरी : रत्नागिरी चेस अॅकॅडमीतर्फे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या खुल्या एकदिवसीय स्पर्धेत चिपळूणच्या ओंकार सावर्डेकर याने अजिंक्यपद पटकावले.

रत्नागिरीच्या सौरीश कशेळकर याला उपविजेतेपद मिळाले, तर सोहम रुमडे याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

चोवीस तासांत संपूर्ण जगभरात खेळल्या गेलेल्या जास्तीत जास्त गेम्सच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी ही स्पर्धा पात्र ठरली असून सर्व स्पर्धकांना आणि आयोजकांना त्या बद्दल जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. रत्नागिरीच्या मराठा भवनमध्ये ही स्पर्धा झाली.

स्पर्धेत एकूण १७२ खेळाडू सहभागी झाले होते. जिल्हास्तरीय स्पर्धेतील हादेखील एक विक्रम करून दाखविल्याबद्दल उज्ज्वला क्लासेसचे पुरुषोत्तम पाध्ये यांनी सर्व खेळाडू, पालक, क्रीडा शिक्षक व बुद्धिबळ प्रशिक्षक यांचे आभार मानले. स्पर्धेला उज्ज्वला क्लासेसचे प्रायोजकत्व लाभले होते.

स्पर्धा एकूण ७ फेऱ्यांमध्ये साखळी पद्धतीने खेळविण्यात आली. स्पर्धेत खेळले गेलेले एकूण ५८७ गेम्स गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डससाठी पात्र ठरले. स्पर्धेचा विस्तृत निकाल असा :

खुला गट :

प्रथम : ओंकार सावर्डेकर, द्वितीय : सौरीश कशेळकर, तृतीय : सोहम रुमडे, चार ते दहा अनुक्रमे : सई प्रभुदेसाई, अनंत गोखले, यश गोगटे, शुभम बेंद्रे, आयुष रायकर, वरद पेठे, श्रीहास नारकर.

उत्तेजनार्थ बक्षिसे: सर्वोत्कृष्ट वरिष्ठ खेळाडू : सुनील शिंदे.

सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू : निधी मुळ्ये, अस्मी गांधी.

१५ वर्षे वयोगट : चिराग प्रभुदेसाई, मृणाल कुंभार, १४ वर्षे वयोगट : आर्यन धुळप, सोहम बावधनकर.

१३ वर्षे वयोगट : सर्वेश दामले, यश काटकर.

१२ वर्षे वयोगट : ओम उतेकर, शाल्व कारेकर.

११ वर्षे वयोगट : आराध्य गर्दे, अलिक गांगुली.

१० वर्षे वयोगट : विहंग सावंत, नील कुडाळी.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी रत्नागिरी चेस अॅकॅडमीचे संचालक विवेक सोहनी, वरद पेठे, चैतन्य भिडे, मानस सिधये तसेच उज्ज्वला क्लासेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला सीए दीपाली पाध्ये, सीए शरद वझे, ॲड. गौरव महाजनी, सीएस पुरुषोत्तम पाध्ये उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow