रत्नागिरी : मोफत खैर रोपांच्या नोंदणीसाठी आवाहन

Aug 9, 2024 - 15:45
 0
रत्नागिरी : मोफत खैर रोपांच्या नोंदणीसाठी आवाहन

त्नागिरी : पुढील वर्षीच्या पावसाळ्यामध्ये लागवडीसाठी शेतकऱ्यांना खैराची रोपे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याकरिता येत्या १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत वन व सामाजिक वनीकरण विभागाकडे नोंदणी करण्याचे आवाहन विभागीय उपवनसंरक्षक गिरीजा देसाई यांनी केले आहे.

पुढील वर्षीच्या लागवडीसाठी आताच नोंदणी करणे आवश्यक आहे. ती केल्यास आवश्यक तालुकानिहाय रोपवाटिकांचे नियोजन करून खैर रोपे वेळेत शेतकऱ्यांना वाटप करण्यात येतील. खैर रोपांची मागणी आणि नोंदीसाठी वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या ८६००५१६४०८ किंवा ९५९५६३५१४४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.

जिल्ह्यातील अत्यंत पोषक वातावरणामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये खैर प्रजातींच्या रोपांच्या शेतीला चांगल्या प्रकारे वाव आहे. परिपक्व आणि मोठ्या खैर झाडाच्या प्रत्येक भागाचा उपयोग आहे. खैर झाडाच्या लाकडापासून कात तयार होतो. इमारतीसाठी लाकूड, पानांचा उत्तम चारा म्हणून वापर, कोळसा तयार करण्यासाठी, विविध औषधी गुणधर्मांमुळे साल, फुले, डिंक, लाख यांचा वापर होतो. त्यामुळे खैराचे झाड म्हणजे कोकणातील नारळीच्या झाडाप्रमाणे कल्पतरू आहे. शेतकऱ्यांनी खैराची लागवड शाश्वतरीत्या केल्यास जिल्ह्यामध्ये कात उद्योगांना चालना मिळेल, स्थानिक लोकांना कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व इतर जिल्ह्यातून आणि परराज्यांतून खैर लाकूड आयात करावे लागणार नाही.

खैर शेतीतून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळून आर्थिक सुबत्ता वाढू शकेल आणि कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. खैर रोपांची लागवड प्रतिवर्षी केल्यास येणाऱ्या काळात जिल्हा खैर लाकडासाठी स्वावलंबी बनेल. सध्या खैर लाकडास प्रतिटन ९० हजार रुपये बाजारमूल्य आहे. खैर शेतीसाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्यामार्फत शेतकऱ्यांना करण्यात येईल.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:10 09-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow