आईचे दूध नवजात शिशुसाठी अमृतासमान : डॉ. विकास कुमरे

Aug 12, 2024 - 10:06
 0
आईचे दूध नवजात शिशुसाठी अमृतासमान : डॉ. विकास कुमरे

◼️ पालीत स्तनपान सप्ताह कार्यक्रम 

पाली : आईचे दूध हे नवजात शिशुसाठी अमृतासमान आहे. प्रसूतीनंतर आईने बाळाला दिलेले स्तनपान म्हणजेबाळाचे पहिले लसीकरण आहे, असे म्हणायला हरकत नाही, कारण हे चीक दूध बाळाला अर्ध्या ते एक तासाच्या आत दिले पाहिजे. अशा चीकदुधातून मिळणाऱ्या घटकांमुळे बाळाला रोगप्रतिकारशक्ती मिळते. त्यामुळे पुढे एक वर्षापर्यंत बाळाला अनेक आजारापासून संरक्षण मिळते. जन्मापासून ते ६ महिन्यापर्यंत बाळाला निव्वळ स्तनपान दिले पाहिजे कारण ६ महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपान पुरेशा प्रमाणात दिल्याने बाहेरच्या आहाराची गरज नसते. ६ महिन्यानंतर बाळाला आईच्या दुधासोबतच बाहेरचा हलका पूरक आहार सुरु केला पाहिजे. कारण या सवयीने १ वर्षापर्यंत बाळ पूर्ण जेवण करू शकेल व पुढे कुपोषणाची समस्या निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.विकास कुमरे यांनी मार्गदर्शन करताना केले. 

ग्रामीण रुग्णालय पाली व डी.जे.सामंत वरीष्ठ महाविद्यालय यांचा संयुक्तविद्यमाने पाली येथे जागतिक स्तनपान सप्ताह व राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रम सामंत महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी जनजागृतीपर प्रभातफेरी डी.जे.सामंत वरीष्ठ महाविद्यालयापासून पाली बसस्थानक ते ग्रामीण रुग्णालय पाली येथपर्यंत मोठ्या उत्साहात घोषणा देत काढण्यात आली. या कार्यक्रमांना अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.विकास कुमरे, सामंत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कांता कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन साळुंखे, दंत शल्यचिकित्सक डॉ. शुभदा बडवे,अधिपरीचारिका नीलम गिम्हवणेकर,महाविद्यालयाचे प्रा.ज्ञानेश्वर म्हात्रे,प्रा.वीणा शिंदे, ग्रा.रु. लिपिक संजोग जाधव उपस्थित होते. 

यावेळी मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन साळुंखे यांनी माहिती देताना सांगितले की, हिपॅटायटीस हा हेपॅटोव्हायरस ए , बी , सी , डी आणि ई या विषाणूंमुळे होतो.  हिपॅटायटीसच्या इतर सामान्य कारणांमध्ये अति मद्यपान, विषारी पदार्थ, इतर संक्रमण यांचा समावेश होतो. हिपॅटायटीस ए आणि ई प्रामुख्याने दूषित अन्न आणि पाण्यामुळे पसरतात. हिपॅटायटीस बी हा प्रामुख्याने गर्भधारणेदरम्यान किंवा बाळाच्या जन्मादरम्यान आईकडून बाळाला देखील संक्रमित होऊ शकतो आणि संक्रमित रक्ताद्वारे पसरतो, हिपॅटायटीस सी सामान्यतः संक्रमित रक्ताद्वारे पसरतो जसे की इंट्राव्हेनस ड्रग वापरकर्त्यांद्वारे सुई शेअर करताना उद्भवू शकते.हिपॅटायटीस डी फक्त हिपॅटायटीस बी ची आधीच संसर्ग झालेल्या लोकांनाच संक्रमित करू शकतो.हिपॅटायटीस ए, बी आणि डी लसीकरणाने टाळता येऊ शकतात.
    
डॉ.विकास कुमरे यांनी स्तनपानाचे फायदे व हिपॅटायटिस या आजारा संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.अधिपरिचारिका नीलम गिम्हवणेकर यांनी आजारापासून दूर राहण्यासाठी सोप्या उपाययोजना सांगितल्या. सामंत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ कांता कांबळे यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमाला ग्रा.रु.पालीचे अधिकारी व कर्मचारी त्याच बरोबर सामंत महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी,महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रा.वीणा शिंदे यांनी व आभार प्रदर्शन ग्रा.रु.पालीचे लिपिक संजोग जाधव यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 12-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow