सुप्रियाताई, सरडा अचानक पिंक कसा झाला? : संजय राऊत

Aug 16, 2024 - 14:57
 0
सुप्रियाताई, सरडा अचानक पिंक कसा झाला? : संजय राऊत

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंक (गुलाबी) रंगाचे जॅकेट घालायला सुरुवात केली आहे. हा रंग शुभ असल्याचं अजितदादांना सांगितलं गेलं आहे. त्यामुळेच त्यांनी या रंगाचे जॅकेट रोज घालायला सुरुवात केल्याचं सांगितलं जात आहे.

त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. सुप्रिया ताई, तुमच्या लाडक्या भावाने पिंक रंग वापरायला सुरुवात केली आहे. ताई, सरडा पिंक कसा झाला? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी हा सवाल करताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला.

महाविकास आघाडीचा माटुंग्याच्या षण्मुखानंद हॉलमध्ये मेळावा पार पडला. या मेळाव्याला ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेस नेते नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. सर्वच नेत्यांची यावेळी भाषणे झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाविकास आघाडीने हा मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना खासदार संजय राऊत यांनी अजितदादा पवार यांना पिंक रंगावरून जोरदार टोले लगावले.

ते गेले, हेही जातील

सुप्रिया सुळे या महाराष्ट्राची लाडकी बहीण आहेत. या बहिणीसाठीच बारामतीत महाराष्ट्र लढला. तुमच्या लाडक्या भावाने तर आता रंग बदलला आहे. ते पिंक झाले आहेत. सरडा रंग बदलतो. पण तो अचानक पिंक कसा होऊ शकतो? असा सवाल अजितदादांनी केला. गुलाबी रंग हा महाराष्ट्राचा रंग नाही. महाराष्ट्राचा रंग भगवा आणि तिरंगा आहे. केसीआर यांनी तेलंगणात गुलाबी रंग घेतला. त्यांचा पराभव झाला. हे सुद्धा जातील, असा टोला त्यांनी लगावला.

हे तर ढोंग

लाडकी बहीण योजनेसारखं ढोंग जे सुरू आहे, असं ढोंग देशात कुठेच चालू नसेल. सरकारी पैशाने मतं विकत घेण्याचा हा प्रकार आहे. पण ऐक सांगतो. नाती ही पैशानं विकत घेता येत नाहीत. या आधीही असे अनेक प्रयत्न झाले. पण नाती विकत घेता आली नाही, असंही ते म्हणाले.

ना वाद, ना भांडण…

यावेळी त्यांनी महाविकास आघाडीत कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट केलं. महायुतीत कोणताही वाद नाही आणि कोणतंही भांडण नाही. वाद असता तर महाविकास आघाडी लोकसभा जिंकलीच नसती, असा दावा त्यांनी केला. महाविकास आघाडीचे नेते भक्कम आहेत. आमच्या ऐक्याला कोणताही तडा जाणार नाही. वादाचा एकही तुकडा उडणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तुम्ही कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी आमची एकी कुणीही फोडू शकणार नाही. आमच्यात कुणीही फूट पाडू शकणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:24 16-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow