कोयना धरणातून एकवीस महिन्यानंतर सांडवा विसर्ग सुरू

Jul 26, 2024 - 12:35
 0
कोयना धरणातून एकवीस महिन्यानंतर सांडवा विसर्ग सुरू

कोयनानगर : गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्याची स्थिती उद्भवली नाही. १७ ऑक्टोबर २०२२ ला बंद करण्यात आलेले वक्र दरवाजे तब्बल एकवीस महिन्यानंतर गुरुवारी सायंकाळी उघडण्यात आले.

कोयना धरणाच्या पाणीपातळीत मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून गुरुवारी सकाळी पाणीसाठ्याने सांडवा पातळी गाठली आहे. धरणातील आवक वाढत राहिल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी वक्र दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
कोयना धरण परिसरात गत आठ-दहा दिवसापासून तळ ठोकून बसलेल्या पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात उच्चांकी वाढ केली असून जुलै महिन्यात पंचवीस दिवसात सुमारे ५५ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिले तर काही दिवसात धरण पूर्ण क्षमतेने भरू शकते.

गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या आकडेवारीनुसार धरणातील पाणीसाठा ७८.२१ टीएमसी तर पाणीपातळी २१३९ फूट ६५२ मीटर झाल्याने धरणाची सांडवा पातळी ७३.१८ टीएमसी पार केली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने आवक ८५ हजार क्युसेकवर पोहोचली असून चालू तांत्रिक वर्षातील उच्चांकी आहे.

धरणाचे सहा वक्र दरवाजे गुरुवारी सायंकाळी दीड फुटाने उघडून १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सुरू केला आहे. तर दोन दिवसांपूर्वी पायथा वीजगृहातून सुरू केलेला १०५० क्युसेक असा एकूण ११ हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरू आहे. पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी ओढे, नाले व कोयना नदीच्या उपनद्यांचे पाणी पात्राबाहेर असलेने कोयना नदीपात्र विस्तीर्ण होणार असून नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

गत सहा वर्षात पाणीसाठ्याने गाठलेली सांडवा पातळी

सन २०१९ : ३० जुलै
२०२० : ९ऑगस्ट
२०२१ : २२ जुलै, २०२२ : ९ ऑगस्ट, २०२३ : १ ऑगस्ट
२०२४ : २५ जुलै

गत पाच वर्षात सांडव्यातून विसर्ग

२०१९ : ३ ऑगस्ट
२०२० : १५ ऑगस्ट
२०२१ : २३ जुलै
२०२२ : १२ ऑगस्ट
२०२३ : विसर्ग नाही
२०२४ : २५ जुलै

कोयना नदीच्या किनाऱ्यावर पूररेषा

कोयना नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर निळी व लाल पूररेषा आखण्यात आल्या असून यामधील निळी पूररेषा २५ वर्षाच्या आवर्ती पुराची उंची दर्शविते तर लाल पूररेषा १०० वर्षाच्या आवर्ती पुराची उंची दर्शविते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:03 26-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow