मंडणगड : गांधीचौक पुलावरून एसटी वाहतूक सुरू

Aug 17, 2024 - 11:39
 0
मंडणगड : गांधीचौक पुलावरून एसटी वाहतूक सुरू

मंडणगड : अतिवृष्टीत नादुरुस्त झाल्याने मोठ्या वाहनांच्या वाहतुकीसाठी गेल्या एक महिन्यांपासून बंद करण्यात आलेल्या गांधीचौक मार्गावरील त्या पुलावरून अखेर एसटी वाहतूक सुरू झाली आहे. पुलावरून एसटीचा मार्ग बंद झाल्याने अडखळ, कोंझर व टाकवली येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागत होते.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामस्थांच्या जनभावना लक्षात घेऊन तहसील कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन विभाग, सार्वजनिक बांधकाम खाते, आगार व्यवस्थापन, नगरपंचायत व ग्रामस्थांची सभा तीन दिवसांपूर्वी मंडणगड येथे झाली. त्यामध्ये ग्रामस्थ या प्रश्नासाठी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याने सर्व विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी यांनी पुलाची सुंयक्तरित्या पाहणी केली. आगार व्यवस्थापनाने नगरपंचायतीने पूल वाहतुकीस सुरक्षित असल्याचे लेखी पत्र दिल्याशिवाय वाहतू‌क सुरू करणार नसल्याचा पवित्रा घेतला, नगरपंचायतीने धोकादायक झालेला पूल केवळ एका बाजूने तात्पुरत्या स्वरूपात भराव करून लहान वाहनाच्या वाहतुकीसाठी खुला केल्याचे त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने भराव टाकणे अद्याप बाकी असल्याचे सांगितले, नवान पुलाच्या निर्मितीसाठी प्रस्ताव दिल्याचे सांगितले. बांधकाम अभियंत्यांनी पूल वाहतूकीस सुरक्षित असल्याचा अहवाल आवश्यक असल्याने तो मिळाल्यावर वाहतुकीसाठी आवश्यक पत्र देऊ, असे सांगितले. यानंतरही ग्रामस्थ वाहतुकीसाठी आग्रही राहिल्याने तहसील कार्यालयाच्यावतीने पावसामुळे बंद ठेवलेला पूल पाऊस नसल्याने सुरक्षेच्या उपाययोजनांचा अंगीकार करून खुला करण्यास हरकत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सर्व संबंधित खात्यांची सहमती व ग्रामस्थांनी सुरक्षेचे उपाय अंगीकारण्याचे आश्वासन दिल्याने पुलावरून एसटी वाहतूक सुरू झाली आहे. महिनाभरापासून बंद असलेली वाहतूक सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना पायपीट थांबली आहे. नव्याने होणाऱ्या पुलासाठी गतीने उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. चर्चेवेळी तहसीलदार संजय गुरव, अभियंता कुलदर, नगरपंचायत अधिकारी अभिजित राणे, आगाराच्या दरीपकर, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, नगरसेवक आदेश मर्चेंडे, ग्रामस्थ गणेश महाडीक, दिनेश रक्ते, दत्ताराम महाडीक, किशोर महाडीक, जयवंत जाधव, कल्पेश शिंदे, भरत शिंदे, विश्वनाथ दाबेकर, शंकर गायकवाड, सतीश जाधव, आत्माराम महाडीक, आदी उपस्थित होते.

पुलाअगोदर प्रवासी उतरणार
एसटी पुलाजवळ आली की, सर्व प्रवासी गाडीतून खाली उतरतील. गाडी पुलावरून पास झाली की, गाडीतून खाली उतरलेले प्रवासी पुन्हा गाडीत बसतील. जेव्हा जेव्हा गाडी पुलावरून जाईल त्या प्रत्येकी वेळी ग्रामस्थ विनातक्रार आपली सुरक्षा लक्षात घेऊन खाली उतरून वेळोवेळी सहकार्याची भूमिका घेतील. याउपर एखादी अप्रिय घटना घडल्यास त्याची जबाबदारी ही सामूहिक राहील. त्यासाठी कोणा एका विभागास दोष देता येणार नाही, असे सभेत ठरवण्यात आले. त्याला सर्वांनी मान्यता दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 17/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow