गृहखात्याच्या कामावरही बोलता येईल, पण सध्या शांतता महत्त्वाची : शरद पवार

Aug 17, 2024 - 14:24
 0
गृहखात्याच्या कामावरही बोलता येईल, पण सध्या शांतता महत्त्वाची : शरद पवार

मुंबई : बांग्लादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून मोर्चांचं आयोजन केलं जात आहे.

मात्र नाशिकमध्ये काल आयोजित केलेल्या या मोर्चाला गालबोट लागलं आणि शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शांततेचं आवाहन करत इतर देशातील घटनांवरून आपल्या देशातील नागरिकांचे जीवन संकटात आणू नका, अशी भूमिका नागपूर इथं पत्रकारांशी बोलताना मांडली आहे.

शरद पवार म्हणाले की, "बांग्लादेशात सत्तापरिवर्तन झालं. तरुण पीढीने तेथील सत्ताधाऱ्यांविरोधात उठाव केला होता. मात्र त्यातून नंतर काही घटना घडल्या. या घटनांची प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटत आहे. बांग्लादेशात जे घडलं त्याचे परिणाम महाराष्ट्रात होतील, असं कधी वाटलं नव्हतं. अशा परिस्थितीत समाजात एकवाक्यता आणि सामंजस्य निर्माण होण्याची गरज आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी जे काही घडलं ते राज्याच्या आणि समाजाच्या हिताचं नाही. आज शांततेची गरज असून ती शांतता प्रस्थापित करायची असेल तर समाजकारण आणि राजकारणातील लोकांनी संयमाचा पुरस्कार करावा. शासनाची कामगिरी, शासनाची कार्यवाही आणि गृहखात्याची कामगिरी यावरही बोलता येईल. पण आज मला शांतता आणि सौहार्द याचं महत्त्व जास्त वाटतं," असं पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, "जे लोक अशा हिंसाचारात सहभागी होत आहेत, त्यांना मला सांगायचंय की, अन्य देशात घडलेल्या घटनांसाठी आपल्या देशातील लोकांचं जीवन उद्ध्वस्त होईल किंवा संकटात येईल, असं काही करता कामा नये," अशी भूमिकाही शरद पवारांनी मांडली.

नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?

बांगलादेशात राजकीय अराजकता माजल्यानंतर हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात शुक्रवारी नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून नाशिक बंदची हाक देण्यात आली होती. मात्र काही लोकांनी बंदला विरोध दर्शवित दुकाने बंद करण्यास नकार दिला. त्यामुळे दोन गटात वाद झाले. दोन गट समोरासमोर आल्याने भद्रकाली परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला. पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:50 17-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow