मुंबई-गोवा महामार्गावरून शिवसेना नेते रामदास कदम आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्यात खडाजंगी

Aug 19, 2024 - 14:47
 0
मुंबई-गोवा महामार्गावरून शिवसेना नेते रामदास कदम आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्यात खडाजंगी

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपाच्या २ ज्येष्ठ नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री असून त्यांना आवर घाला, ते युती तोडण्याचं काम करतायेत असा आरोप शिवसेना नेते रामदास कदमांनी केला तर रामदास कदम हे अडाणी, त्यांनी १५ वर्षात काय केले असा परखड सवाल करत चव्हाणांनी पलटवार केला आहे.

शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले की, मी दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र पाठवलं आहे. तुमचा सार्वजनिक बांधकाम मंत्री त्याला आवर घाला. तो युती तोडण्याचं काम करतोय. दापोलीत जी भाजपा आहे ती आमच्या मुळावर कशी उठलीय ते मी दिल्लीला कळवलं आहे. १४ वर्षानंतर प्रभू रामाचा वनवास संपला परंतु मुंबई-गोवा महामार्गाचा वनवास संपला नाही. नितीन गडकरींनी स्वत: लक्ष घालावे यासाठी शिष्टमंडळाला घेऊन भेट घेणार आहे. आम्ही काय पाप केलंय, रवींद्र चव्हाण हे चमकोगिरी करतात. काम करत नाही. खड्डेमय रस्ते आहेत. नुसते पाहणी दौरे कशासाठी, रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री त्यांचा राजीनामा घ्यायला हवा अशी संतप्त भूमिका त्यांनी मांडली.

तर कोकणातील जनता आम्हाला सवाल विचारते, आम्हालाही सहन करण्याची मर्यादा आहे. युतीत असतानाही आम्ही हे बोलतोय. घरचा आहेर दिला पण आम्हाला नाईलाज आहे. पालकमंत्री म्हणून आमचे उदय सामंत अतिशय चांगले काम करतायेत. एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम उदय सामंत करतायेत. कोकणात युतीमध्ये कुठेही अडचण नाही. दापोलीतील भाजपा मंडळी राक्षसी हेतूने काम करतायेत. आमदार योगेश कदम यांना बदनाम करण्याचं काम करतायेत. याबाबत वरिष्ठांना तक्रार केली आहे. हे थांबवा, आम्ही विश्वास ठेवून तुमच्यासोबत आलोय पण आमचा विश्वासघात होतोय असंही रामदास कदमांनी म्हटलं.

तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही...

दरम्यान, बोलायला मला सुद्धा येते. कधीतरी रस्त्यात समोरासमोर या. कशा भाषेत मला बोलता येते कुणी वाचवायला राहणार नाही. लक्षात ठेवा. रवी चव्हाण आहे. मी उत्तर देईन. युती धर्म पाळतोय याचा अर्थ कुणी काहीही बोलेल आणि ऐकून घेऊ असं नाही. तोंड सांभाळून बोलायचे, तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही. रामदास कदम अडाणी माणूस. राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न नितीन गडकरींच्या अख्यातरित्य येतो. टाळ्या वाजवणारेही अडाणी असावेत. १५ वर्ष स्वत: मंत्री होते. ३० वर्ष शिवसेनेत नेते होते काय केले असं प्रत्युत्तर रवींद्र चव्हाण यांनी रामदास कदमांना दिले आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:52 19-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow