म्हाडाची फेक वेबसाईट बनवणाऱ्या दोघांना अटक

Aug 19, 2024 - 15:02
 0
म्हाडाची फेक वेबसाईट बनवणाऱ्या दोघांना अटक

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी असेलल्या मुंबईतील स्वप्नाच्या घरासाठी म्हाडाने 2030 घरांची लॉटरी काढली असून अर्ज भरायला देखील सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या जाहिरातीनंतर मुंबईकरांचाही मोठा प्रतिसाद म्हाडाला मिळत असून चौकशीसंदर्भाने विविध माध्यमातून म्हाडाशी संपर्क साधला जात आहे.

त्यातच, म्हाडाच्या याच जाहिरातीचा आधार घेऊन म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यास फेक वेबसाईट बनवून नागरिकांची लूट करण्यात येत असल्याचीही घटना समोर आल्या आहेत. स्वत: म्हाडाने याची दखल घेत पोलिसांता तक्रार दाखल केली होती. म्हाडाच्या घरासाठी डिपॉझिट रक्कम म्हणून भरण्यात येणाऱ्या 50 हजार आणि 1 लाख रुपयांच्या रकमेतून मोठा अपहार करण्यात येत असल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर, म्हाडाने मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर आता दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

म्हाडाचे (Mhada) बनावट संकेतस्थळ तयार करून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याची धक्कादायक बाब नुकतीच उघड झाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत म्हाडाच्या माहिती संचार आणि तंत्रज्ञान विभागाकडून वांद्रे –कुर्ला संकुल येथील सायबर कक्षाकडे तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानुसार सायबर पोलिसांनी पुढील कारवाई करत नुकतीच याप्रकरणी दोघांना अटक (Crime News) केली आहे. एकाला नालासोपाऱ्यातून तर दुसऱ्याला माहीममधून सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यातील एक म्हाडाचा अधिकारी असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

बीकेसी सायबर सेल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा नालासोपाऱ्यामधून एकाला तर माहीममधून एकाला अटक करण्यात आली आहे. अमोल पटेल (29 वर्षे ) आणि कल्पेश सेवक (35 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणाचा सूत्रधार कल्पेश सेवक असल्याचे तपासात समोर आले आहे. कल्पेश सेवक यानेच बनावट संकेतस्थळ तयार केले होते. तर या बनावट संकेतस्थळावरील पेमेंट लिंकद्वारे पन्नास हजाराची जी रक्कम ऑनलाईन पद्धतीने अदा झाली होती ती कल्पेश सेवक याच्या बँक खात्यामध्ये जमा झाली होती. हाच धागा पकडत पोलिसांनी तपास केला आणि आरोपींना पकडण्यात यश मिळवले. अमोल पटेल हा आपण म्हाडाचा अधिकारी असल्याचे सांगत नागरिकांना घरे दाखवत असे आणि म्हाडाची घरे देण्याच्या नावे त्यांची फसवणूक करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:52 19-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow