चिपळूणमध्ये १० ठिकाणी 'पब्लिक अॅड्रेस सिस्टीम' कार्यान्वित

Jun 3, 2024 - 16:04
Jun 3, 2024 - 16:22
 0
चिपळूणमध्ये १० ठिकाणी 'पब्लिक अॅड्रेस सिस्टीम' कार्यान्वित

चिपळूण : आपत्तीबाबत नागरिकांना वेळीच पूर्वसूचना मिळाव्यात यासाठी शहरातील उक्ताड गणपती मंदिर गोरीवले इमारत, अलिना अपार्टमेंट भेंडीनाका, मनोहर आर्केड बुरुमतळी, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, देसाई बिल्डिंग काविळतळी, कृष्णाजी कॉम्प्लेक्स चिंचनाका, बाजारपेठ गांधी चौक, कमलकुंज बिल्डिंग पेठमाप, गोवळकोटरोड सॉ मिल शेजारी, गोवळकोट रोड कमानीजवळ अशा १० ठिकाणी पब्लीक अॅड्रेस सिस्टीम बसवण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्या भागात पाणी भरत आहे याची माहिती पालिकेसह महावितरण विभागाला मिळणार आहे.

महावितरणची यंत्रणा पाण्यात जाऊ नये यासाठी महावितरणकडून खबरदारी घेतली जात आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा २४ तास पहारा असणार आहे. नागरिकांना विजेची सवय झाली आहे. शहर आणि तालुका अंधारात राहणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांनी दिली. ते म्हणाले, महावितरणने प्रत्येक उपविभाग स्तरावर आपत्ती निवारण कक्ष स्थापन केला आहे. 

आपत्कालीन परिस्थितीत विद्युतपुरवठा खंडित करण्यासाठी २४४७ नियंत्रण कक्ष स्थापित केला आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये महावितरणची उच्चदाब वाहिनी, लघुदाब वाहिनी, रोहित्र यांची देखभाल दुरुस्ती करिता अधिकृत ठेकेदार व बेरोजगार अभियंते यांची नेमणूक करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये लागणारे किरकोळ विद्युत साहित्य आणि उपकरणांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरांमध्ये महापूर आल्यास ज्या भागात पाणी साचते ते ठिकाण निश्चित करून तेथे कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे.

पाणी साठल्याबाबतची माहिती महावितरणला मिळावी यासाठी संबंधित ठिकाणच्या व्यक्तीची नावे व संपर्क क्रमांक संकलित करण्यात आली आहेत. दवाखाने, शासकीय विभाग, पोलिस ठाणे यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये विद्युतपुरवठा बाधित झाल्यास विजेकारिता पर्यायी मार्गाचे नियोजन करण्याची सूचना केली आहे. 

नोडल अधिकाऱ्यांकडे राहणार सॅटेलाईट फोन

 नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये अनेकवेळा मोबाईल यंत्रणा ठप्प होते. त्यामुळे संपर्क करताना अनेक अडचणी येतात. यामुळे पालिकेने नवीन सॅटेलाईट फोन खरेदी करून तो नोडल अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिला आहे. आपत्तीच्यावेळी हा फोन महत्त्वाचा ठरणार आहे.

शहरात रात्री पाऊस पडायला सुरवात झाली की अनेकांना घरात पाणी आल्याचा भास होतो. झोपेतून दचकून जाग येते आणि मग पुन्हा २२ व २३ जुलैची आठवण होते. चिपळूणवासीयांची ही चिंता आता पावसाळा जवळ येऊ लागल्याने अधिकच गडद झाली आहे. प्रकाश दीक्षित, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:32 PM 03/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow