रत्नागिरी : जिल्ह्यात नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन उत्साहात साजरी

Aug 20, 2024 - 10:39
 0
रत्नागिरी : जिल्ह्यात नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन उत्साहात साजरी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. समुद्राला नारळ अर्पण करून मच्छी मारांनी पारंपरिक पद्धतीने मासेमारीला सुरुवात केली.

बा दर्या राजा शांता हो, अशी प्रार्थना करत दर्याला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. रत्नागिरीत पोलीस दलामार्फत सोन्याचा नारळ दर्याला अर्पण केला जातो. त्यानंतर कस्टम विभाग आणि नंतर नागरिक समुद्राला नारळ अर्पण करतात. पोलिसांनी समुद्राला नारळ अर्पण करण्याची परंपरा ५४ वर्षांपूर्वीची आहे. मच्छीमार, खारवी समाजाशी पोलिसांचे संबंध दृढ राहावे, नैसर्गिक आपत्ती किंवा संकटापासून रत्नागिरीचे रक्षण व्हावे, या उदात्त हेतूने पोलिसांचा सोन्याचा नारळ वाजत गाजत पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सर्वप्रथम अर्पण केला जातो. समाजाकडून समुद्राला शांत राहण्यासाठी आणि त्यांना मच्छीमारीमध्ये बरकत मिळावी, यासाठी नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करून शांत राहण्याची प्रार्थना केली जाते. त्यानुसार आज पोलीस मुख्यालयातील महापुरुषाच्या मंदिरातून सोन्याचा नारळ वाजत गाजत निघाला. मांडवी जेटीवरून मनोभावे प्रार्थना करून हा नारळ अर्पण करण्यात आला. कस्टम विभागाकडूनही दर्याला नारळ अर्पण केला जातो. समुद्रमार्गे होणारी तस्करी रोखण्यासाठी सीमा शुल्क दल (कस्टम) काम करते. समुद्रात वारंवार त्यांची गस्त सुरू असते. त्यामुळे समुद्रापासून आपले रक्षण व्हावे, या उद्देशाने तेदेखील नारळी पौर्णिमेला नारळ अर्पण करतात. सीमाशुल्क दलाने नारळ अर्पण केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांनीही नारळ अर्पण केला. हा उत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वातावरण ढगाळ असले, तरी पाऊस पडत नव्हता. त्यामुळे मोठी गर्दी झाली. 

जिल्ह्यात रक्षबंधनाचा सणही उत्साहात साजरा झाला. अनेक शाळांनी शाळेत रक्षाबंधन साजरे केले. विद्यार्थ्यांना निसर्गाचे महत्त्व पटावे, यासाठी झाडांना राखी बांधण्यात आली. नारळी भाताचे आजच्या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन अनेक हॉटेल्सनी तयार नारळी भाताची विक्री केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 20-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow