साडवलीतील सामूहिक सुविधा केंद्र कार्यान्वित होणार; ११ दिवसांच्या उपोषणाने खात्याला जाग

Aug 20, 2024 - 11:03
Aug 20, 2024 - 12:12
 0
साडवलीतील सामूहिक सुविधा केंद्र कार्यान्वित होणार; ११ दिवसांच्या उपोषणाने खात्याला जाग

साडवली : महाराष्ट्र औद्योगिक समूह विकास योजनांतर्गत एमआयडीसी साडवली येथे उभारलेले सामूहिक सुविधा केंद्र मार्च २०१९ ला कार्यान्वित होणे आवश्यक होते; परंतु, विकास (उद्योग) यांना मशीन चालू करून देण्याबाबत वारंवार संपर्क करूनसुद्धा पाच वर्षांच्या कालावधीनंतरही मशिनरी सुरू न केल्याने उद्योग सुरूच झाला नाही. या विरोधात उपोषण केल्यावर संबंधित विभागाने बंद मशिनरी सुरू करून देण्याची तयारी दाखवली. यामुळे ११व्या दिवशी मसुरकर यांनी उपोषण स्थगित केले.

मशिनरी बंद पडल्याचा मोठा आर्थिक भुर्दंड समूह कंपनीला सोसावा लागत आहे. आता हा आर्थिक भार डोईजड झाल्यामुळे आणि शासन, प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आपल्याला न्याय मिळावा यासाठी सामूहिक सुविधा केंद्राचे अध्यक्ष कमलाकर गोपाळ मसुरकर हे शुक्रवार (ता. ९) पासून बेमुदत उपोषणाला देवरूख येथे बसले होते. ११ दिवस होऊनही शासनाकडून ठोस निर्णय झाला नव्हता; मात्र पालकमंत्री, आमदार, सर्वपक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांनी पाठपुरावा केल्याने उपोषण स्थगित झाले.

रविवारी रात्री कमलाकर मसुरकर यांची तब्येत खालावली महसूल विभाग, पोलिस निरीक्षक, आरोग्य विभाग यांनी तत्काळ मसुरकर यांच्यावर उपचारासाठी प्रयत्न केले. दरम्यान, जिल्हा उद्योगकेंद्राचे निरीक्षक आकाश म्हेत्रे यांनी लवकरच बंद असलेल्या मशिनरीबाबत पावले उचलली जातील, असे सांगितले. एक मशिनरीची तत्काळ दुरुस्तीही सुरु झाल्याने मसुरकर यांनी उपोषण स्थगित करत असल्याचे जाहीर केले. या वेळी आमदार शेखर निकम उपस्थित राहणार होते, पण वेळेअभावी ते पोहचू शकले नाहीत म्हणून त्यांनी तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेडकर यांना पाठवले होते. या समूहाचे संचालक ९ ऑगस्टपासून त्यक्षणिक उपोषणामध्ये सहभागी होते.

९ ऑगस्टपासून उपोषण
लोहार समाजाने एकत्रित येऊन सुरू केलेला उद्योग केवळ मशिनरी कार्यान्वित करून न दिल्यामुळे चार वर्षे बंद आहे. महाराष्ट्र सरकारचे ४ कोटी अनुदान मिळून सुमारे पाच कोटीची गुंतवणूक या उद्योगामध्ये केली आहे. कर्ज रकमेवर प्रचंड व्याज द्यावे लागत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली म्हणून त्यांनी ९ ऑगस्टपासून उपोषण सुरू केले होते. संगमेश्वर तालुक्यात आजवरच्या इतिहासात सलग ११ दिवस चाललेल्या लोहार समाजाच्या उपोषणाची नोंद झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 20/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow