चिपळूण : सावर्डेतील प्रदूषित पाण्याच्या विरोधात उपोषण सुरूच

Aug 22, 2024 - 11:07
 0
चिपळूण : सावर्डेतील प्रदूषित पाण्याच्या विरोधात उपोषण सुरूच

चिपळूण : सावर्डेतील कात कंपनीविरोधात परिसरातील सात गावांतील लोकांनी स्वातंत्र्यदिनी सुरू केलेले साखळी उपोषण सलग सातव्या दिवशी सुरू आहे. प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू असून देखील प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल न घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळानेदेखील कोणतीच दखल घेतलेली नाही. त्यामुळे आगामी काळात हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

सावर्डे परिसरातील कापशी नदीकिनारी बसलेले सावर्डे, दहिवली, कोंडमळा, आगवे, मार्डकी, ओमळी, ढोक्रवली आदी गावांना कात कंपनीच्या प्रक्षित पाण्याचा फटका बसत आहे. याविरोधात स्वातंत्र्यदिनापासून येथील ग्रामस्थांनी प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. गेल्या १२ वर्षांपासून कात कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे परिसरातील नदी, ओढे, विहिरी प्रदूषित झाल्या आहेत. येथील लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

याविषयी सावर्डेतील ग्रामस्थ सुरेश भुवड यांनी माहिती देताना सांगितले की, या प्रदूषित पाण्याविषयी आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत कात कंपनीच्या मालकासमवेत फेब्रुवारी महिन्यात बैठक झाली होती. या बैठकीत दोन महिन्यांत कात कंपनी परिसरात जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येईल, असे कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, गेल्या सहा महिन्यांत जलशुद्धीकरण केंद्र उभारलेले नाही. येथील ग्रामस्थ प्रदूषण विरोधात वर्षानुवर्षे झगडत आहेत. मात्र, त्याची दखल घेतली जात नाही. सातही गावांमधील प्रक्षित काळसर रंगाचे पाणी सोडले जात असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाल्याने हे उपोषण करावे लागले.

उपोषणाआधी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या समवेत बैठक झाली. या बैठकीला कात कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. बावेळी प्रांताधिकाऱ्यांनी जलशुद्धीकरण केंद्र दोन महिन्यांचा कालावधीत उभारले जाईल, तेव्हा उपोषण मागे घ्या, असे आवाहन केले, परंतु, कंपनी व्यवस्थापनाकडून कोणीही आले नररल्याने अखेर उपोषणाचा निर्णय घेतला.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर विभागाने यापूर्वी या कात कंपनीला वीज, पाणी व उत्पादन बंद करण्याची नोटीस बजावली होती. यामध्ये वीजपुरवठा व पाणीपुरवठा खंडित झाला असला तरी उत्पादन सुरूच असल्याचा आरोप भुवड यांनी केला.

ग्रामसभेकडे सर्वांचे लक्ष
सावर्डे ग्रामपंचायतीची ग्रामसभा गुरुवारी, दि. २२ रोजी होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ व ग्रामपंचायतीकडे ग्रामस्थांनी कात कंपनीबाबतची माहिती अधिकारात मागितली आहे. तत्पूर्वी सावर्डेत होणाऱ्या ग्रामसभेत प्रदूषित पाण्याचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. त्याकडे सावर्डेवासीयांसह सर्वांचे लक्ष लागलेले आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 22/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow