चिपळुणमध्ये पंचायत समितीची इमारत होणार सहामजली

Aug 22, 2024 - 14:04
Aug 22, 2024 - 15:06
 0
चिपळुणमध्ये पंचायत समितीची इमारत होणार सहामजली

चिपळूण : पंचायत समितीची नवीन सहामजली इमारत उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या असलेल्या पंचायत समितीच्या इमारतीपासून जवळच सर्व शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे आहे त्याच ठिकाणी पंचायत समितीची नवीन इमारत उभारावी, अशी मागणी चिपळूण तालुका सरपंच संघटनेने पंचायत समितीसह जिल्हा परिषदेकडे निवेदन देत केली आहे. सरपंच संघटनेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनानुसार, शहरातील बहादूरशेखनाका येथे पंचायत समिती सभापती निवासस्थानची जागा आहे. याच जागेत बीओटी तत्त्वावर पंचायत समितीची सहामजती वास्तू उभारण्याचे नियोजन आहे. या नव्या इमारतीत पंचायत समितीचे सर्व विभाग एकाच छताखाली आणले जाणार आहेत. शिवाय मोठा हॉलदेखील येथे साकारणार आहे.

आचारसंहितेपूर्वीच त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. शहरातील प्रांत, तहसील, भूमिअभिलेख, पोलिस ठाणे, दिवाणी न्यायालय, दुय्यम निबंधक कार्यालय, महावितरण, वनविभाग, तालुका आरोग्य विभाग, नगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, आदी विविध शासकीय कार्यालये जवळच आहेत. त्यामुळे पंचायत समितीची नवीन इमारत आहे त्याच ठिकाणी झाल्यास ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्रामस्थांना सोयीचे होणार आहे. त्यामुळे सध्याच्या ठिकाणीच नवीन इमारत प्रस्तावित करावी, अशी मागणी सरपंच संघटनेने केली आहे.

पंचायत समितीची प्रस्तावित सहामजली इमारत तालुक्यासाठी गौरवास्पद असणार आहे. पंचायत समितीजवळच विविध शासकीय कार्यालये असल्याने आहे तेथेच नवीन इमारत झाल्यास ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांना ते सोयीचे ठरणार आहे. योगेश शिर्के, अध्यक्ष, चिपळूण तालुका सरपंच संघटना

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:32 PM 22/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow