धक्कादायक! राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळला

Aug 26, 2024 - 14:53
Aug 26, 2024 - 15:23
 0
धक्कादायक! राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळला

सिंधुदुर्ग : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची संतापजनक घटना घडली आहे. नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होते.

मात्र हा पुतळा दुर्देवाने कोसळल्याची घटना घडली आहे. पुतळा कोसळण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

४ डिसेंबर २०२३ रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा सलाम म्हणून हा पुतळा उभारण्यात आला होता. मात्र वर्षभरातच हा पुतळा कोसळल्याचा प्रकार उघडकीस आला. नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते या भव्य पुतळ्याचं अनावरण करण्यात आले होते. हा पुतळा कोसळण्यामागे कारण काय हे अद्याप कुणी प्रशासकीय अधिकारी सांगत नाही.

ठाकरे गट आक्रमक

या पुतळ्याचं बांधकाम निकृष्टपणे केले होते. आता सरकार ही जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतील. या पुतळ्यासाठी सरकारने खर्च केला आहे. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत नाहीतर शिवप्रेमी म्हणून फक्त जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात आम्ही आंदोलन करणार आहोत अशी संतप्त भूमिका ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी घेतली.

दरम्यान, भाजपाच्या नेत्यांनी सातत्याने राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला आणि मते घेतली पण नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनानिमित्त मालवण येथील राजकोट येथे मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुपारी कोसळला. निकृष्ठ बांधकामामुळे हा पुतळा कोसळला आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार करणाऱ्या या लोकांना महाराष्ट्राची जनता कदापी माफ करणार नाही असं विधान काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे.

या घटनेची चौकशी होईल - मंत्री दीपक केसरकर

तर मला या घटनेची माहिती नाही. जर हे घडलं असेल तर अतिशय दुर्दैवी आहे. आमचे पालकमंत्री हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री असल्याने ते या सर्व प्रकाराची चौकशी करतील याची खात्री आहे. चौकशी होईलच परंतु हा पुतळा त्वरीत उभा करण्यासाठी प्राधान्य असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला समुद्री किल्ला बांधला तिथे हा पुतळा आहे. त्यामुळे याला भावनिक महत्त्व आहे. त्यासाठी जे काही तातडीने करायला हवं ते आमचे सरकार करेल अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकरांनी दिली.

ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:20 26-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow