शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी नारायण राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

Aug 28, 2024 - 10:52
 0
शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी नारायण राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

सिंधुदुर्ग : मालवण सिंधुदुर्गातील राजकोट परिसरात आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळला आणि अवघा महाराष्ट्र हळहळला.

व्यवस्थेविरुद्ध संताप व्यक्त करीत शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला असून, कोणालाही जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. यावरून महाविकास आघाडीचे नेते महायुती आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. यावर रत्नागिरी सिंधुदुर्गाचे भाजपा खासदार नारायण राणे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देताना विरोधकांवर पलटवार केला.

झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आमची अस्मिता आहे. हा पुतळा नौदलाने उभारला होता. या घटनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी ४५ किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहत होता. त्यामुळे पुतळ्याचे नुकसान झाल्याचे सांगितले. पुन्हा तिथे महाराजांचा पूर्णाकृती पुतळा दिमाखात उभा करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यानंतर भाजपा नेतेही यावर प्रतिक्रिया देत आहेत.

काँग्रेसच्या काळात अशा किती दुर्घटना घडल्या आहेत

काँग्रेसच्या काळात अशा किती दुर्घटना घडल्या आहेत. संपूर्ण इमारतीही कोसळल्या आहेत. असे देशात प्रथमच घडले आहे का, असा प्रतिप्रश्न करत, मी उद्या तिथे जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांपासून सर्वांना बोलावले आहे. सर्व माहिती घेतल्यानंतर सविस्तर बोलेन. असे एक क्षेत्र सांगा जिथे काँग्रेस बदनाम झाली नाही. ते म्हणतात की बेरोजगारी वाढली, पण तुमच्या काळात किती बेरोजगारी होती, असा जाब नारायण राणे यांनी विचारला.

दरम्यान, छत्रपती शिवराय यांचा जो पुतळा खाली आला ही आपल्या सगळ्यांसाठी दु:खद घटना आहे. या घटनेमुळे सगळ्यांच्या मनाला वेदना झाल्या आहेत. मात्र, त्याच्यावर जे राजकारण चालले आहे. ते अधिक वेदनादायी आहे. जो खरा छत्रपतींचा मावळा आहे तो अशा प्रकारचे फोटो कधीच व्हायरल करणार नाही. हे करणे अतिशय चुकीचे आहे, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 28-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow