Thackeray Vs Rane clash At Rajkot Fort : अंगार, भंगार, पेंग्विन ते कोंबड्या आणल्या नाहीत; छ. शिवरायांच्या 'राजकोट'वर कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर..

Aug 28, 2024 - 14:14
 0
Thackeray Vs  Rane clash At Rajkot Fort : अंगार, भंगार, पेंग्विन ते कोंबड्या आणल्या नाहीत; छ. शिवरायांच्या 'राजकोट'वर कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर..

सिंधुदुर्ग : ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळल्यानंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय रणकंदन सुरू झालं आहे.

या घटनेनंतर अवघ्या शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली असतानाच आज राजकोटवर राजकीय महानाट्य पाहायला मिळाले. अभूतपूर्व असा राडा शिवसेना ठाकरे गटामध्ये आणि भाजपमध्ये राजकोटच्या पवित्र भूमीमध्ये झाला. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर पाहणी करण्यासाठी एकाचवेळी खासदार नारायण राणे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार पोहोचल्यानंतर हस्तांदोलन केले. मात्र, आदित्य ठाकरे सुद्धा पोहोचल्यानंतर अभूतपूर्व असा राडा झाला. यावेळी दोन्ही गटाकडून अर्वाच्च भाषेत हिणवण्याचा प्रयत्न झाला.

राजकोटचा परिसर राजकीय आखाडाच झाला

यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडल. दोन्हीकडून एकमेकांना धक्काबुक्की सुद्धा झाली. एकमेकांना खालच्या पातळीवर शब्द वापरून हिणवण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. त्यामुळे एक प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली. महाविकास आघाडीकडून आंदोलन होणार होते तर पोलिसांनी अतिरिक्त कुमक का मागवली नाही? राजकीय इतिहास माहीत असताना सुद्धा नारायण राणे समर्थक आणि ठाकरे गटाचे समर्थक एकमेकांसमोर आले. त्यांच्यामध्ये का अंतर ठेवले गेले नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. किल्ल्याचे चिरे सुद्धा पडल्याच्या घटना घडल्या. इतकेच नव्हे तर या घटनांमध्ये पोलीस सुद्धा जखमी झाल्याची घटना घडली. त्यामुळे शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी राहिली बाजूलाच आणि राजकोटचा परिसर हा राजकीय आखाडाच झाला.

तुटपुंजा पोलिस बंदोबस्त

एकमेकाना आव्हान प्रतिआव्हानाची भाषा वापरली गेली. पहिल्यांदा त्यांनी जावं, अशीच भूमिका दोन्ही गटाकडून व्यक्त झाल्याने पोलीस सुद्धा या संपूर्ण वादामध्ये हतबल झाल्याचे दिसून आले. मुळातच सुरुवातीला तुटपुंजा पोलिस बंदोबस्त दिसून येत होता. त्यानंतर अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. मात्र आक्रमक असलेल्या कार्यकर्त्यांसमोर पोलिसांचं काही सुद्धा चालत नसल्याचे दिसून आलं. त्यामुळे एक प्रकारे दोन्ही गटांकडून एकमेकांवर धावून जाण्यास सुद्धा प्रयत्न झाला. हा वाद एका बाजूने सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा निलेश राणे आणि नारायण राणे यांच्याशी बोलून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. मात्र, कोणीही ऐकण्याच्या स्थितीत नसल्याचे दिसून आलं.

दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सुद्धा आम्हाला जर 15 मिनिटात प्रवेश दिला गेला नाही, तर आम्ही सुद्धा घुसू असा अल्टिमेटम दिला. त्यामुळे दोन्ही बाजूने दोन्ही बाजूने संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली. वातावरण तणावग्रस्त झाल्याने जिल्हाधिकारी सुद्धा आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले. पोलिसांकडून निलेश राणे यांना विनंती करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर आम्ही स्थानिक आहोत, ते बाहेरचे आहेत असे म्हणत एक प्रकारे आम्ही इथून हटणार नाही अशी भूमिका घेतली. आदित्य ठाकरे गटाकडून सुद्धा आम्हाला मार्ग मोकळा करून द्यावा अशी भूमिका घेतली. ज्या ठिकाणी शिवरायांचा पुतळा कोसळला होता त्याठिकाणी आदित्य थांबून होते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:40 28-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow