शिंदे गटाच्या आमदाराची गाडी धुताना पोलीस कर्मचारी कॅमेरात कैद

Aug 29, 2024 - 17:04
 0
शिंदे गटाच्या आमदाराची गाडी धुताना पोलीस कर्मचारी कॅमेरात कैद

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे चर्चेत आहेत. मुलाच्या वाढदिवशी तलावारीने केक कापल्याचा व्हिडीओ व्हायरल होण्यापासून ते बदलापूर अत्याचार प्रकरणात मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या विधानापर्यंत संजय गायकवाड यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

अशातच आता एका नव्या वादात आमदार संजय गायकवाड हे अडकण्याची शक्यता आहे. आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता पोलीस कर्मचारी हे संरक्षणासाठी असतात की आमदारांची गाडी धुण्यासाठी असा सवाल आता विचारला जात आहे.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याशी संबधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सकपाळ यांनी हा व्हिडीओ त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर एक पोलीस कर्मचारी त्यांची गाडी पाण्याने धूत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमुळे संजय गायकवाड यांच्यासह पोलीस प्रशासनावरही टीका करण्यात येत आहे.

"कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा! सद्रक्षणाय , खलनिग्रहणाय हे ब्रीद अंगीकारणारी महाराष्ट्र पोलीस यंत्रणा जनतेच्या व आया बहिणीच्या सुरक्षेसाठी आहे, की आमदाराच्या गाड्या धुण्यासाठी ? दोन दिवसांपूर्वी आमदारांनी असंवेदनशील वक्तव्य केले होते ! मुख्यमंत्री काय शाळेत जाऊन पहारा देणार आहेत का ? एस. पी. आरोपीच्या घरी जाऊन बसणार आहेत का? आज सकाळी या प्रश्नाचे उत्तर मिळाले . पोलीस आमदारांच्या गाड्या धुणार आहे! पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना," अशा कॅप्शनसह हर्षवर्धन सकपाळ यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

एकीकडे राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे पोलीस कर्मचारी आमदार आणि लोकप्रतिनिधींच्या गाड्या धुण्यात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सामान्य नागरिकांकडून या प्रकरणी रोष व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, बदलापूर अत्याचार प्रकरणावरूनही आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानाने वादंग निर्माण झाला होता. "बदलापूरची घटना दुर्दैवी आहे. हा गुन्हा करणारी एक विकृती आहे. पण विरोधक या घटनेवरून राजकारण करत आहेत. काल आंदोलन पाहिलं सर्व पक्ष त्याच्यावर थयथयाट करत होते. या घटनेला सरकारला जबाबदार धरत आहेत. पण आता काय मुख्यमंत्री राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये जाऊन पहारा देणार आहेत का? की पोलीस अधिक्षक त्यांच्या घरी जाऊन बसणार आहेत? आरोपी गुन्हा करण्यापूर्वी पोलिसांना फोन करून सांगतो का?" असा सवाल आमदार संजय गायकवाड यांनी केला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:33 29-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow