देवरूख तहसील आवारात 75 फुटी ध्वजस्तंभाचे लोकार्पण

Aug 31, 2024 - 10:11
 0
देवरूख तहसील आवारात 75 फुटी ध्वजस्तंभाचे लोकार्पण

देवरुख : विद्यार्थीदशेतच असलेल्या मुलांमध्ये राष्ट्रप्रेम व देशभक्ती निर्माण व्हावी याच उद्देशाने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत 75 फुटी ध्वजस्तंभ फडकविण्याचे कार्य हाती घेतले. संगमेश्वर तहसील कार्यालयात फडकलेल्या आजच्या या ध्वजाकडे पाहून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम तरळत राहावे तसेच या ध्वजाचा अवमान होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे, असे उद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी देवरुख येथील ध्वजस्तंभ लोकार्पण सोहळ्याप्रसंगी काढले.

हा ध्वज मुलांच्या डोळ्यासमोर राहिल्यामुळे आपल्या देशाप्रति त्यांच्या मनात प्रेम राहील. तिरंग्याचा अपमान हा माझा अपमान ही भावना प्रत्येकामध्ये असली पाहिजे असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत त्यांनी यावेळी केले. राज्यातील रत्नागिरी जिल्हा हा 75 फुटी ध्वज प्रत्येक तालुक्यात फडकवणारा पहिला जिल्हा ठरला आहे.

आपल्या संकल्पनेतूनच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात व जिल्हा पोलीस कार्यालयासमोर हे ध्वज उभारण्यात आले, असे सांगून या ध्वजाची महानता व त्याचे नियम विद्यार्थ्यांना शासनाकडून सांगणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद करून देवरुख येथील ध्वजाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाल्याचे सांगितले. यावेळी आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसीलदार अमृता साबळे, माजी सैनिक अमर चाळके आदी मान्यवर उपस्थित होते. ध्वजस्तंभाचे उद्घाटन माजी सैनिक यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उपस्थित माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. माजी सैनिकांचा आदर्श सर्व विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. आज हे सैनिक आहेत म्हणून आपण शांत झोप घेत आहोत यासाठी त्यांचा सन्मान होणे महत्त्वाचे आहे, असेही ना. सामंत यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 31-08-2024

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow