रत्नागिरी : छिद्र पडल्यामुळे 'त्या' नौकेला जलसमाधी

Aug 31, 2024 - 10:05
Aug 31, 2024 - 10:10
 0
रत्नागिरी : छिद्र पडल्यामुळे 'त्या' नौकेला जलसमाधी

रत्नागिरी : तालुक्यातील पूर्णगड येथील समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर एक मच्छीमारी नौका बुडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ तटरक्षक दलाने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले, तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले आणि नौकेवरील दोन खलाशांना जीवदान दिले. नौकेला छिद्र पडल्यामुळे त्या बोटीला जलसमाधी मिळाल्याचे तटरक्षक दलाकडून सांगण्यात आले.

रत्नागिरी येथील भारतीय तटरक्षक दलाच्या पथकाला गुरुवारी (ता. २९) सायंकाळी केरळकडे जात असलेली माऊली मासेमारी नौका पूर्णगडाजवळ बुडत असल्याचा संदेश सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास मिळाला. रत्नागिरीपासून सुमारे १२.७ नॉटिकल मैल (अंदाजे २३ किमी) अतंरावर ती नौका होती. तटरक्षक दलाने शोध आणि बचाव (SAR) यंत्रणा सक्रिय करत कमी कालावधीत ऑपरेशन सुरू केले. मेरिटाईम रेस्क्यू को-ऑर्डिनेशन केंद्राने (MRCC) पूर्णगड भागातील नाविकांना घटनास्थळावर लक्ष ठेवण्यासाठी आणि आवश्यकता भासल्यास मदत देण्यासाठी सूचना दिली.

रत्नागिरी येथील तटरक्षक दलाच्या एअरस्टेशनच्या समन्वयाने खलाशांचा जीव वाचवण्यासाठी हवाई मोहीम आखली. एका तासाच्या आत स्वदेशी बनावटीचे अत्याधुनिक हलके हेलिकॉप्टर हे मच्छीमारांची सुटका करण्यासाठी पूर्णगडला पाठविण्यात आले. जोरदार पाण्याच्या प्रवाहाशी झुंजत असलेल्या दोन मच्छीमारांना बुडणाऱ्या बोटीतून मदतीसाठी ओरडताना मदत पथकाने पाहिले. अत्यंत आणि आव्हानात्मक हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीत अचूकपणे दोन मच्छीमारांना हेलिकॉप्टरमधून सुरक्षितपणे बाहेर काढले, त्यांना एअरस्टेशनवर आणण्यात आले. तिथे त्यांना त्वरित वैद्यकीय सेवा मिळाली. त्या नौकेवर कर्नाटकातील २ मच्छीमार होते आणि ते कर्नाटकातील मालपे येथे नौका घेऊन जात होते. दुपारच्या सुमारास बोटीला एक छिद्र पडले. ज्यामुळे समुद्राचे पाणी वेगाने नौकेत शिरले. मदत पथकाने मासेमारी नौका नांगर टाकून तिथेच उभी करून ठेवली होती.

नौका बुडाल्याचा अंदाज
समुद्र खवळलेला असल्यामुळे तटरक्षक दलाला नौका किनाऱ्यावर आणणे शक्य झाले नाही. खलाशांना बाहेर काढल्यानंतर ती नौका बुडाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 31/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow