...तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला नसता : नितीन गडकरी

Sep 4, 2024 - 11:13
 0
...तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला नसता : नितीन गडकरी

वी दिल्ली : सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करताना त्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर झाला असता तर तो पुतळा (Shivaji Maharaj Statue) पडला नसता, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केले.

समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात कोणतेही बांधकाम करताना त्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा (Stainless Steel) वापर होणे गरजेचे आहे. कारण स्टेनलेस स्टीलला गंज लागत नाही, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. ते मंगळवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलत होते.

समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपूलांसाठी स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात यावा, यासाठी मी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करत आहे. मी मुंबईत जेव्हा 55 उड्डाणपूल बांधले तेव्हा मी एका माणसासोबत फेरफटका मारत होतो. तेव्हा त्याने मला उड्डाणपूलासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडावर पावडर कोटिंग वापरण्यात आल्याचे दाखवले होते. या पावडर कोटिंगमुळे लोखंड गंजणार नाही, असा दावा त्याने केला होता. मात्र, नंतरच्या काळात मुंबईतील उड्डाणपूलांसाठी वापरण्यात आलेल्या लोखंडाला गंज लागला. त्यामुळे आता मला असे वाटते की, समुद्रकिनाऱ्यापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या भागात रस्त्यांचे बांधकाम करताना स्टेनलेस स्टीलचाच वापर करण्यात यावा. राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करतानाही स्टेनलेस स्टील वापरले असते तर हा पुतळा पडला नसता, असे नितीन गडकरी यांनी म्हटले.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नटबोल्ट गंजले

भारतीय नौदलामार्फत राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या 28 फुटी ब्राँझच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती. हा पुतळा जयदीप आपटे या शिल्पकाराने उभारला होता. या पुतळ्याच्या जोडणीसाठी वापरण्यात आलेले नटबोल्ट गंजल्याची माहिती समोर आली होती. याबाबत सार्वजनिक विभागाने नौदल विभागाला कळवले होते. परंतु, नौदलाकडून त्यानंतर कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत. शिवाजी महाराजांचा हा पुतळा तयार करण्यासाठी तब्बल 2 कोटी 44 लाख रुपयांचा खर्च झाला होता. पंतप्रधान मोदी यांनी या पुतळ्याचे अनावरण केले होते. मात्र, आठ महिन्यांमध्ये हा पुतळा पडल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती.

जयदीप आपटेविरोधात लूकआऊट नोटीस जारी

दरम्यान, या प्रकरणात स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील आणि शिल्पकार जयदीप आपटे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी चेतन पाटील यांना पोलिसांना अटक केली आहे. मात्र, जयदीप आपटे अद्याप फरार आहे. पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी पाच पथके तैनात केली असून त्याच्याविरुद्ध लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 04-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow