राजापूर : जुवे बेटावर बाप्पाचे होडीतून आगमन

Sep 9, 2024 - 11:04
Sep 9, 2024 - 11:09
 0
राजापूर :  जुवे बेटावर बाप्पाचे होडीतून आगमन

राजापूर : तालुक्याच्या पश्चिम भागातील जैतापूर खाडीमध्ये विलीन होणाऱ्या अर्जुना नदीच्या मुखाशी वसलेले आणि चारही बाजूने समुद्राच्या निळाशार पाण्याने वेढलेल्या अशा वैशिष्ट्यपूर्ण जुवे बेटासह देवाचेगोठणे बुरंबेवाडी या गावातील गणेशभक्तांच्या घरी बाप्पांचे समुद्रमार्गे होडीतून प्रवास करीत आगमन झाले. गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर तालुक्यामध्ये सुमारे २७ हजार घरगुती आणि दहा सार्वजनिक गणेशोत्सवांची प्रतिष्ठापना झाली.

वर्षभरानंतर बाप्पांचा भक्तांची घरी आगमन झाले आहे. पारंपरिक वाद्य असलेल्या ढोल-ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढीत बाप्पाचे भक्तांनीही जोरदार स्वागत केले आहे. गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर श्रींची आज घरोघरी प्रतिष्ठापना झाली आहे. त्यातून, घरोघरी आनंदी आणि गणेशोत्सवमय वातावरण निर्माण झाले आहे. एका बाजूला कोणाच्या घरी बाप्पांचे चारचाकी गाडीतून, तर कोणाच्या घरी डोक्यावर घेऊन पायी प्रवास करीत बाप्पांचे आगमन झाले आहे. मात्र, तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील वैशिष्ट्यपूर्ण जुवे-जैतापूर, देवाचेगोठणे बुरंबेवाडीमध्ये समुद्रमार्गे होडीतून प्रवास करीत बाप्पांचे भक्तांच्या घरी आगमन झाले आहे.

जैतापूर खाडीमध्ये विलीन होणाऱ्या अर्जुना नदीच्या मुखाशी जुवे बेट वसलेले आहे. या गावामध्ये जा-ये करण्यासाठी छबिना (छोटी होडी) हेच एकमेव साधन आहे. त्यामुळे या छोट्या होडीतून समुद्रमार्गे प्रवास करीत बाप्पांचे जुवे येथील भक्तांच्या घरी आगमन झाले आहे. देवाचेगोठणे बुरंबेवाडी येथील काही गणेशभक्तांकडून समुद्राच्या अलीकडे वसलेल्या दळे येथील गणेश चित्रशाळेमध्ये तयार होणाऱ्या बाप्पांच्या मूर्तींना अधिक पसंती दिली जात आहे. त्यामुळे बुरंबेवाडी येथील भक्तांच्या घरी जाण्यासाठीही बाप्पांना समुद्रमार्गे होडीतून प्रवास करावा लागत आहे. होडीतून प्रवास करीत जुवे, बुरंबेवाडी येथील भक्तांच्या घरी आगमन होत बाप्पा विराजमान झाले आहेत.

तालुक्यामध्ये सुमारे २७ हजार हजार घरगुती, तर दहा सार्वजनिक गणपतींची आज प्रतिष्ठापना झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये शहरातील सार्वजनिक गणेशात्सव मंडळ, महाराष्ट्र वीज वितरण कर्मचाऱ्यांचे गणेशोत्सव मंडळ, एसटी आगारातील चालक- वाहकांचा गणेशोत्सव, ओणी, दसूर, ओझर, जैतापूर, आडीवरे, राजापूर आणि नाटे पोलिसांचा गणेशोत्सव आदी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 9/9/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow