ST Strike : सरकारने फसवणूक केल्यास पुन्हा चक्काजाम करणार - श्रीरंग बरगे

Sep 10, 2024 - 16:00
Sep 10, 2024 - 16:03
 0
ST Strike : सरकारने फसवणूक केल्यास पुन्हा चक्काजाम करणार - श्रीरंग बरगे

कोल्हापूर : सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ६५०० रुपयांची वेतनवाढ केली आहे. हा निर्णय चांगला आहे. बैठकीत या एकमेव मागणीबाबत चर्चा झाली आहे. महागाई भत्ता, वार्षिक वाढ, कर्मचाऱ्यांनी वार्षिक मोफत प्रवास पास यासंदर्भात ठोस निर्णय नाही.

त्यासह वेतनवाढीच्या अंमलबजावणीत सरकारने फसवणूक केल्यास पुन्हा एसटी कर्मचारी राज्यभर चक्काजाम करतील, अशा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस श्रीरंग बरगे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

बरगे म्हणाले, राज्य सरकार आणि एसटी संघटना यांच्यात झालेल्या बैठकीत वेतनवाढीचा निर्णय झाला. मात्र, त्याची अंमलबजावणीचे परिपत्रक तातडीने काढणे गरजेचे आहे. निर्णय होतो; पण परिपत्रकात त्रुटी राहत असल्याचा अनेक वर्षांचा कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे. गतवेळेसही अडीज, चार आणि पाच हजारांची वाढ झाली. मात्र, परिपत्रकात अनेक त्रुटी राहिल्या. सरकार एसटीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करत नाही. वेतनवाढीच्या बैठकीत अध्यक्ष आणि सरचिटणीस यांना बोलाविणे अपेक्षित होते. मात्र, गुणरत्न सदावर्ते बेकायदेशीरपणे या बैठकीत आले.

त्यांच्यामुळे कोणतीही वेतनवाढ आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. सदावर्ते कोणाच्या इशाऱ्यावर चालतात, हे सर्वांना माहिती आहे. या वेळी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँगेसचे विभागीय सचिव संजीव चिकुर्डेकर, सुनील घोरपडे, बाजीराव पाटील आदी उपस्थित होते.

सदावर्तेंनी एसटी बँक बुडविली

कर्मचाऱ्यांनी स्टेट ट्रान्स्पोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेत ६०० हून अधिक कोटी रुपयांच्या ठेवी काढल्या. सदावर्तेंनी ही बँक बुडविली आहे. त्यांच्याच ९ संचालकांनी त्यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. थोड्या दिवसात अन्य संचालकही त्यांना आणि त्यांच्या पॅनलला रामराम ठोकतील. कोट्यवधीच्या ठेवी काढल्याने एसटी कर्मचाऱ्यांना कर्ज मिळत नसल्याने आर्थिक कोंडी होत आहे. एसटीत संगणक प्रणालीसाठी कंत्राटदाराला २१ कोटी दिले आहेत. सदावर्तेवर कोणतीही कारवाई केली जात नाही. सदावर्तेला सरकार घाबरते की काय, असे स्थिती दिसते, असा आरोपही बरगे यांनी केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:25 10-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow