लांजात ३४ हजार ६४९ पाळीव पशू

Sep 10, 2024 - 15:52
 0
लांजात  ३४ हजार ६४९ पाळीव पशू

लांजा : लांजा तालुक्यात भातशेतीचे प्रमाण कमी होऊ लागले आहे, तसेच शेतीला पूरक असलेल्या पशुपालन करणाऱ्यांची संख्याही घटलेली आहे. तालुक्यात ३४ हजार ६४९ एवढेच पाळीव पशू आहेत.

दहा ते पंधरा वर्षाच्या तुलनेत एकत्रित कुटुंबपद्धती असताना सामूहिक शेती, पाळीव जनावरे त्यामध्ये बैल, गायी, शेळ्या या जनावरांचे मोठ्या प्रमाणात पालन करण्यात येत होते. विभक्त कुटुंबपद्धती, घ्यावी लागणारी मेहनत, वैरण या सर्वांमुळे जनावरांचे गोठे गायब झाले. जेमतेम दोन ते तीन अशाच पद्धतीने पशुपालन सुरू आहे. परिणामी, पारंपरिक शेती हळूहळू कमी झाली, तरुणवर्ग कामानिमित्त शहरांकडे वळला आणि गावातील मनुष्यबळ कमी झाले. ठराविक माणसांवर भार पडत असल्याने शेती आणि जनावरे पाळण्याचे प्रमाण कमी होत आहे. कृषी विभाग शेतीबाबत जनजागृतो करत असतात; मात्र नागरिकांची मानसिकता त्या दृष्टीने वळताना दिसत नाही, पशुपालनासाठी शासन अनुदान देते; मात्र ठराविकच शेतकरी त्याचा लाभ घेतात. शेतीचे प्रमाण कमी झाले असताना आता शेतीपूरक पशुपालनाचे प्रमाणही त्यामानाने खूपच कमी झाले आहे. २०१९-२० च्या पशुगणनेनुस्रार लांजा तालुक्यात एकूण ३४ हजार ६४९ एवढेच पाळीव प्राणी आहेत. यामध्ये गायीची संख्या १२ हजार १३९, बैल १५ हजार ९६६, म्हैस २ हजार २२२, रेहे ५२२, शेळ्या ४०६७ या प्रमाणात पशुपालन सुरू आहे. दहा ते पंधरा वर्षापूर्वी लांजा तालुक्यात पशुपालन मोठ्या प्रमाणात सुरू होते.

प्रत्येक गावामध्ये पशुपालन पाहायला मिळत होते; मात्र शेतीपूरक यांत्रिकी अवजारे बाजारात आली आणि बैल-नांगर हो जोडी लोप पावत आहे. ती जागा ट्रॅक्टरने घेतली. शेतीच्या घटत्या प्रमाणामुळे शेतकऱ्यांनी पशुपालनाकडेही हळूहळू पाठ फिरवली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकंदरीत, लांजा तालुक्यात शेतकऱ्यांनी पशुपालनाकडे पाठ फिरवली आहे.

भातक्षेत्र ३ हजार २५० हेक्टरवर
लांजा तालुक्यातील ग्रामीण भागात भात, नाचणी, वरी, तीळ या पिकांचे प्रमाण दिवसेंदिवस घटले आहे. लांजा तालुक्यात एकूण भातपिक ३२५० हेक्टर तर नाचणी २४२ हेक्टरमध्ये अल्प प्रमाणात पीक घेतले जाते आहे.

रिक्त पदांची संख्या वाढतेय
लांजा तालुक्यात पशुपालनासाठी कृषी विभाग व तालुका पशु वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते; मात्र पशु वैद्यकीय विभागाकडे कर्मचारी अपुरे आहे. तालुक्यात १२ पशू दवाखाने आहेत. त्यामध्ये रिक्त पदांची संख्या अधिक आहे. पशु विकास अधिकारी एक कार्यरत तर दोन रिक्त, सहाय्यक पशु विकास अधिकारी एक असून दोन पदे रिक्त आहेत. पशु पर्यवेक्षक नऊ असून दोन रिक्त आणि सहा परिचर असून सहा पदे रिक्त आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:19 PM 9/10/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow