रत्नागिरी : गावखडीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संघर्षमय जीवनाचे देखाव्यातून दर्शन

Sep 12, 2024 - 11:55
Sep 12, 2024 - 12:01
 0
रत्नागिरी : गावखडीत  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संघर्षमय जीवनाचे देखाव्यातून दर्शन

पावस : घरावर तुळशीपत्र ठेवून देशकार्यासाठी काम करीत असताना जहाल हिंदुत्व विचारसरणी रुजवून हिंदू संघटन करीत असताना त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या, त्यांच्या या कार्याची माहिती नवीन पिढीला समजायला हवी व त्यांचा आदर्श सर्वांना घेता यावा यादृष्टीने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा जीवनपट संघर्ष, त्यांनी देशहितासाठी कोणते कार्य केले याची माहिती देणारा देखावा गावखडी येथील धालवलकर बंधूंनी केला आहे.

गावखडी येथील चारुदत्त व महेश धालवलकर हे दोघे भाऊ गेली दहा वर्षे गणेश उत्सवामाध्ये विविध प्रकारचे देखावे सादर करून समाजजागृतीचे काम करीत आहेत. प्रत्येक देखाव्यातून समाजप्रबोधन व्हावे, हा त्यांचा प्रमुख उद्देश आहे. याबाबत श्री. घालवलकर बंधू म्हणाले, यावर्षी आम्ही प्रथमच मोठा देखावा करण्याचे ठरवले. समाजात वावरत असताना सत्पुरुषांच्या समाजोपयोगी व आदर्शवत गोष्टी नवीन पिढीला समजाव्यात या दृष्टीने जहाल हिंदुत्ववादी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्याचा आलेख नवीन पिढीसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे . 

या देखाव्याच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तुरुंगात असताना सोसलेल्या यातना, त्यांना दिला जाणारा त्रास, जेलमध्ये पत्नीसोबत झालेले निर्वाणीचे बोलणे, बोटीतून पाण्यात मारलेली उड़ी व त्यानंतर सोसाव्या लागलेल्या यातना यावर देखाव्यातून प्रकाश टाकण्यात आला आहे.

रत्नागिरीमध्ये दानशूर व्यक्ती भागोजीशेठ कीर यांच्याशी झालेल्या भेटीतून केलेले समाजोपयोगी काम याचाही देखाव्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या सहभागातून देखावा साकारण्याचे काम एक महिना दहा दिवस सुरू होते. यासाठी शाडूची माती, पुठ्ठा व कागदाचा वापर करण्यात आला आहे. स्वा. सावरकरांचे चेहरे नंद‌कुमार लिंगायत, कागदाची गणेशमूर्ती ज्ञानेश कोटकर यांनी तयार केली. त्यामुळेच पर्यावरण पूरक देखावा करता आल्याचे बंधूंनी सांगितले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 9/12/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow