टीईटी परीक्षा १० नोव्हेंबरला

Sep 13, 2024 - 10:05
Sep 13, 2024 - 15:08
 0
टीईटी परीक्षा १० नोव्हेंबरला

रत्नागिरी : पहिली ते आठवीच्या वर्गांवर शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे दि. १० नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे. त्यासाठी दि. ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. जिल्ह्यातील बीएड., डीएडधारकांनी अर्ज भरावेत, असे आवाहन जि.प. शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

राज्यातील पहिली ते आठवीच्या सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक या पदांसाठी उमेदवार टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. राज्यात पवित्र संकेतस्थळाद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्याची भरती अंतिम टप्प्यात आहे, तर दुसऱ्या टप्प्यात काही हजार पदे भरली जाण्याची शक्यता आहे. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीच्या आधीन राहून उमेदवारांना परीक्षेला तात्पुरता प्रवेश देऊन निकाल घोषित केला जाणार आहे. निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणावेळी करण्यात येईल. प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास किंवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल.

सन २०१८ व २०१९ च्या टीईटी गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची परीक्षा परीषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. प्रत्येक उमेदवाराने आपले नाव या यादीत आहे किंवा नाही याबाबत तपासणी करून वस्तुनिष्ठ माहिती भरानी भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर संपादणूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परीषदेकडे राहिल. सन २०१८ व २०१९ च्या गैरप्रकार केलेल्या उमेदवारांच्या यादीत नाव असूनही खोटी माहिती भरून परीक्षा दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

असे आहे वेळापत्रक
टीईटी परीक्षेसाठी दि. ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्याचा कालावधी आहे. दि. २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर प्रवेशपत्र मिळण्याचा कालावधी आहे. दि. १० नोव्हेंबर रोजी परीक्षा होणार असून, पहिला पेपर सकाळी १०.३० ते १ या वेळेत, तर दुसरा पेपर दुपारी २ ते ४.३० या वेळेत होणार आहे.

शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा अनिवार्य आहे. या परिक्षेला जिल्ह्यातील जास्तीत जास्त बीएड, डीएडधारकांनी बसावे. - बी. एम. कासार, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:32 PM 9/13/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow