रत्नदुर्गवर छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे ३ ऑक्टोबर रोजी उद्घाटन : ना. उदय सामंत

Sep 14, 2024 - 09:40
Sep 14, 2024 - 09:42
 0
रत्नदुर्गवर छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे ३ ऑक्टोबर रोजी उद्घाटन  : ना. उदय  सामंत

रत्नागिरी : रत्नदुर्ग किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा तीस फुटी पुतळा उभारण्यात येत असून, याठिकाणचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. याचा शुभारंभ ३ ऑक्टोबर रोजी तर थिबाराजवाड्यावरील मल्टिमीडिया शोचा शुभारंभ, लोकमान्य टिळक कॅशलेस रुग्णालयाचे उ‌द्घाटन २ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्याचबरोबर मतदार संघात अन्य विकासकामांचे उद्घाटनही होणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शासकीय रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय व संशोधन केंद्र, ध्यान केंद्र, प्राणी संग्रहालय, शिवसृष्टी, थ्रीडी मल्टिमीडिया, राजीवडा बंदर सुशोभीकरण व इतर जिल्हा नियोजन विकास कामांचा पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी राहुल देसाई, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, मुख्याधिकारी तुषार बाबर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री ना. सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, १,२,३ ऑक्टोबर रोजी यातील कामांचे उ‌द्घाटन आणि भूमिपूजन करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. किल्ला येथे सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे, याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा तीस फुटी पुतळा उभारण्याचे काम सुरू आहे. हा कार्यक्रम ३ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

लोकमान्य टिळक कॅशलेस रुग्णालयाचे कामही वेगाने सुरु असून, २ ऑक्टोबर रोजी त्याचे उ‌द्घाटन होणार आहे. शहरातील प्रसिध्द अशा थिवा राजवाड्यावरील मल्टिमीडिया शोचे काम गेले वर्षभर सुरू होते, ते पूर्ण झाले असून २ ऑक्टोबर रोजी याचा शुभारंभ होणार आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इमारतीच्या कामाचा शुभारंभही होणार आहे. याच ठिकाणी थिबा राजाने बौध्द मंदिर उभारले होते. याठिकाणी बौध्दविहार उभारला जाणार असून त्यासाठी साडेसात कोटी रुपये देण्यात आले आहेत. या कामाचा शुभारंभ उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले.

मालगुंड येथे होणाऱ्या प्राणीसंग्रहालयासाठी एमआयडीसीने ९९ कोटी रुपये दिले असून याच्या कामालाही प्रारंभ होणार आहे. एमआयडीसीमध्ये पत्रकार भवन उभारण्यासाठी १ कोटीचे इस्टिमेंट तयार करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे गोरगरीब लोकांना लग्नकार्यालयासाठी कमीत कमी खर्चात हॉल उपलब्ध व्हावा यासाठी दोन कोटी रुपये खर्च करून हॉल उभारण्यात येणार असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले.

भाट्ये खाडीतील गाळ नाम फाऊंडेशच्या माध्यमातून काढणार
शहरालगतच्या राजिवडा-भाटचे खाडीतील गाळ नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून काढण्यात येणार आहे. हा गाळ दोन टप्प्यात काढला जाणार आहे. येत्या काही दिवसात या कामाला सुरुवात होणार आहे. येथील मच्छीमारांचा गाळाचा प्रश्न प्राधान्याने सोडवला जाणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. त्याचप्रमाणे राजिवडा ते मांडवीपर्यंतच्या बंधाण्याच्या सुशोभिकरणासाठीही साडेसात कोटी रुपये नियोजनमधून देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 AM 9/14/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow