एसटी कर्मचाऱ्यांना ऑक्‍टोबरपासून मिळणार वाढीव वेतनवाढ : दिलीप साटम

Sep 14, 2024 - 14:55
 0
एसटी कर्मचाऱ्यांना ऑक्‍टोबरपासून मिळणार वाढीव वेतनवाढ : दिलीप साटम

सिंधुदुर्ग : एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

ही वाढ कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरच्या वेतनातून मिळणार असल्‍याची माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप साटम यांनी दिली.

साटम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व इतर मागण्यांसाठी केलेल्या संप पुकारला होता. त्‍यावेळी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. यात एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरसकट ६ हजार ५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मूळ वेतनात ही वाढ देण्यात आली आहे. सप्टेंबरपासून ही वाढ देण्यात आली असून त्‍यानुसार ऑक्‍टोबर महिन्याचे वेतन काढले जाणार आहे. तसे निर्देश राज्‍य शासनाने एस.टी. महामंडळाला दिले आहेत. तसेच १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२४ पर्यंतचा फरक देण्याबाबत महामंडळाने आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर निर्णय घ्यावा, असेही ठरविण्यात आले आहे. १ डिसेंबर २०१९ रोजी मूळ वेतनात पाच, चार व अडीच हजार इतकी देण्यात आलेली वेतन वाढ समायोजित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

कर्मचाऱ्यांना प्रशासनामार्फत सद्यःस्थितीत देण्यात येणाऱ्या वैद्यकीय प्रतिपूर्तीचा आढावा घेण्यात यावा, राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेची संलग्न योजना कर्मचाऱ्यांना कशाप्रकारे देता येईल, याबाबत आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्य परिवहन महामंडळातील सर्व चालक, वाहक व यांत्रिक कर्मचारी, महिला यांना विश्रांतीगृहात सोयी-सुविधा पुरविण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा प्रस्तावही सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही दिलीप साटम यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:24 14-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow